नाशिक प्रतिनिधी: शिलापूर परिसरात मोटारसायकलीवरून संशयास्पदरीत्या फिरणार्या दोघांना आडगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरलेल्या दोन मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्या आहे. तपासादरम्यान या दोघांनी जानोरी (ता. दिंडोरी) येथे घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले.
याबाबत अधिक माहिती अशी, की आडगाव पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील कर्मचारी शिलापूर गावाजवळ पेट्रोलिंग करत असतांना दोनजण संशयितरित्या यामाहा आर- 15 व बजाज पल्सर मोटारसायकलींवरून संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे पोलिसांना दिसले.
पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला. त्यावेळी ते दोघेही दुचाकीस्वार तेथून पळून जाऊ लागल्याने पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून शिलापूर शिवारातील गोलू टी स्टॉलजवळ ताब्यात घेतले. त्यांची अधिक चौकशी केली असता श्रावण पोपट भालेराव (वय 23, रा. नांदूरनाका) व सोनू ऊर्फ अनिल माणिक शिंदे ( वय 21, रा. जेलरोड, नाशिकरोड) अशी त्यांनी नावे सांगितली. सुरुवातीला त्यांनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता दोन्ही मोटारसायकली चोरीच्या असल्याचे दिसून आले. या मोटारसायकली उपनगर व कसारा या परिसरातून चोरल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर जानोरी (ता. दिंडोरी) येथे घरफोडी केल्याचेही त्यांनी कबूल केले.
या प्रकरणी उपनगर पोलिसांनी दोघांना अटक केली असून, या यशाबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख, गुन्हे शोध पथकाचे स. पो. नि. हेमंत तोडकर, स. पो. उ. नि. भास्कर वाढवणे, हवालदार सुरेश नरवडे, अंमलदार दिनेश गुंबाडे, निखिल वाघचौरे, अमोल देशमुख, पोलीस नाईक वाघ यांच्या पथकाचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे व वरिष्ठ अधिकार्यांनी अभिनंदन केले आहे.