नाशिक प्रतिनिधी: मोटारसायकल स्लीप होऊन डोक्यास गंभीर मार लागून दोघांचा मृत्यू झाल्याच्या दोन घटना शहरात घडल्या. अपघाताचा पहिला प्रकार भगूरजवळ घडला. आनंद सामंत राय (वय 30, रा. पनवेल) हा दि. 25 मार्च रोजी रात्री 10 च्या सुमारास भगूर रोडवरून मोटारसायकलीने जात होता. दरम्यान, त्याची मोटारसायकल स्लीप झाल्याने त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला.
त्याची पत्नी रिना राय यांनी औषधोपचारासाठी त्यांना गंगापूर रोड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अपघाताचा दुसरा प्रकार पाथर्डी गावाजवळ घडला. अनिल अशोक दोंदे (वय 32, रा. दोंदे मळा, नाशिक) हा मोटारसायकलीने प्रवास करीत असताना पाथर्डी गाव येथून त्याच्या राहत्या घरी जात होता. त्यादरम्यान, जाधव पेट्रोल पंपासमोर दोंदे याची मोटारसायकल स्लीप झाल्याने त्याच्या डोक्यास गंभीर मार लागला होता. त्याला औषधोपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र प्रकृती गंभीर असल्याने दोंदे याला आडगाव मेडिकल कॉलेज पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.
उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.