मुंबई (भ्रमर वृत्तसेवा):- मागील आठवड्यात शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ’सामना’च्या मुख्य संपादकपदाची जबाबदारी स्वतःकडे घेतली आहे.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ’दैनिक सामना’च्या संपादकपदापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. मार्च 2020 महिन्यात हे पद उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आले होते. मात्र आता उद्धव ठाकरे हे दैनिक सामनाचे मुख्य संपादक असतील. तर कार्यकारी संपादकपदी संजय राऊत यांचं नाव कायम ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे येत्या काळात ’दैनिक सामना’मधून खुद्द उद्धव ठाकरे यांच्याकडून भाजप तसेच इतर विरोधकांवर टीकेचे आसूड ओढले जाण्याची शक्यता आहे.
संजय राऊत यांच्या अटकेनंतर सामनाचे अग्रलेख कोण लिहिणार, रोखठोक सारखं सदर कोण लिहिणार असे प्रश्न उपस्थित झाले होते. मला अग्रलेख लिहायला द्या, अशी मागणी देखील केली होती. पण ते शक्य नसल्याने उद्धव ठाकरे हेच ’सामना’चे मुख्य संपादक झाले आहेत. त्यामुळे आगामी काळात विरोधी पक्ष तसंच शिवसेनेच्या बंडखोरांवर सामनाच्या माध्यमातून आसूड अशी शक्यता आहे.