नाशिक प्रतिनिधी : द्राक्ष हंगामापासून सुरु झालेली अवकाळीची अवकृपा अद्यापही कायम आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका हा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास शहरातील काही भागात अवकाळी पावसाला सुरुवात झाली.
दरम्यान अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले. आज सकाळपासून काही वेळ ऊन तर काही वेळ ढगाळ वातावरण होते. दुपारी दीड वाजेच्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि दोन वाजता नाशकात अवकाळी पावसाने हजेरी लावली.
दरम्यान, पुढील चार दिवस राज्यभरातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. गुरुवारी संपूर्ण राज्यात अवकाळीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.तर शुक्रवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
शनिवारी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांत पावसाचा इशारा देण्यात आला असून रविवारी विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे बळीराजाचा हातातोंडाशी आलेला घास जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.