Nashik Crime : उपनगरला अनैतिक संबंधातून पत्नीच्या प्रियकरावर प्राणघातक हल्ला

नाशिक (प्रतिनिधी) :- पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या रागातून पतीने पत्नीच्या प्रियकराच्या गळ्यावर वार करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, टाकळीरोडवरील नारायणाबापूनगर परिसरात राहणार्‍या 30 वर्षीय इसमाचे एका विवाहित महिलेशी अनैतिक संबंध होते. ही बाब तिच्या पतीला समजल्याने त्याने काल रात्री आठ वाजेच्या सुमारास या प्रियकराच्या गळ्यावर वार करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. घटना घडल्यानंतर तो तेथून पसार झाला. स्थानिक नागरिकांनी त्या जखमी इसमास प्रथम सिव्हील हॉस्पिटल व त्यानंतर पुढील उपचाराकरता डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज येथे दाखल केले.

घटनास्थळी पोलिसांना आरजे 09एसएक्स 3992 या क्रमांकाची मोटारसायकल मिळून आली. त्यावरून माहिती घेतली असता जखमी इसमाचे शेजारी राहणार्‍या महिलेशी असलेल्या प्रेम संबंधांतून तिच्या नवर्‍याने आपल्या साथीदारासह आगळ टाकळी गाव येथील उसाच्या शेताजवळ त्याच्या गळ्यावर सुरा मारून त्यास गंभीर जखमी केल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी त्वरीत संशयित आरोपीचा शोध घेत त्याला त्याच्या साथीदार व पत्नीसह ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे. याप्रकरणी जखमी इसमाच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून भादंवि कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे काम उपनगर पोलीस ठाण्यात सुरू आहे. पोलिसांनी या जखमी इसमास खासगी रुग्णालयात दाखल केले असून, त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!