नाशिकरोड (प्रतिनिधी):- शिवसेनेचे बंडखोर नेते, मंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ लावलेल्या होर्डिंगला अज्ञात शिवसैनिकांनी काळे फासून त्यावर “गद्दार”असे लिहून ते फरार झाले. त्यामुळे गांधीनगर परिसरात खळबळ उडाली आहे.

शिवसेनेचे नेते, मंत्री एकनाथ शिंदे यांनी ५० आमदार घेऊन आसाम राज्यातील गुवाहाटी येथे पलायन करून शिवसेनेविरुद्ध बंड पुकारले आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बंडखोर नेते एकनाथ शिंदे भारतीय जनता पार्टी बरोबर जातील, असे वातावरण राज्यभरात निर्माण झाले आहे.

शिंदे व बंडखोर आमदार यांचे मन परावर्तीत करण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांसह महाविकास आघाडीतील नेत्यांनीही गेल्या चार दिवसांपासून प्रयत्न करीत आहे. मात्र, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिंदे व बंडखोर आमदार कोणाचे ऐकण्यास तयार नाही. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
त्याच पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, सम्राट चौक या ठिकाणी शिवसेना वैद्यकीय आघाडी चे नेते व एकनाथ शिंदे समर्थक योगेश म्हस्के व सुजित जिरापुरे यांनी मोठे होर्डिंग लावले होते. आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास अज्ञात शिवसैनिकांनी होर्डिंगला काळे फासून त्यावर “गद्दार”असे लिहून फरार झाले. माहिती समजताच उपनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पंकज भालेराव व सहकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. तो पर्यंत शिवसैनिक गायब झाले होते.
याबाबत योगेश म्हस्के यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते नॉटरीचेबल होते. पोलिसांनी मनपा अधिकारी यांच्या बरोबर संपर्क साधला असून सदर चे होर्डिंग काढण्याबाबत सांगण्यात आले आहे. परिसरात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.