नाशिकरोड (प्रतिनिधी):- पोलीस पत्नीसह महिलांचे ओरबाडून नेलेले स्त्रीधन, मोटरसायकल व मोबाईल असा उपनगर पोलिसांकडील जवळपास बारा गुन्ह्यातील सुमारे 5 लाखांचा मुद्देमाल सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

उपनगर पोलीस ठाणे अंतर्गत मागील काळात दुचाकी चोरी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडणे, त्याबरोबर मोबाईल चोरी करणे असे प्रकार मोठ्या प्रमाणात घडले होते. त्यात नाशिकरोड पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस पत्नीची दोन तोळ्यांची पोत ओरबडली होती.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर, पोलीस निरीक्षक पंकज भालेराव, गुन्हे शोध पथकाचे अधिकारी, कर्मचारी यांनी या गुन्हेगारांना शिताफीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ओरबाडून, चोरून नेलेला मुद्देमाल जप्त केला.

जप्त केलेले सात तोळे सोने, सात मोटरसायकल व एक मोबाईल असा जवळपास पाच लाखाचा मुद्देमाल सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ सिद्धेश्वर धुमाळ यांच्या हस्ते फिर्यादी यांना वाटप करण्यात आले.
त्यात अर्जुन भिकाजी गवळी, डॉ किशोर प्रेमसुख भंडारी, शैलेंद्र श्रीधर गायकवाड, हेमंत प्रवीण उबाळे, लता सुनील खंडारे, उल्लमाबी उस्लम खान, सिद्धांत शांताराम दोंदे यांच्या मोटरसायकल व पोलीस पत्नी माधुरी विलास गांगुर्डे यांची दोन तोळे ९७० मिली वजनाची पोत, कल्पना धर्मेंद्र मोरे या महिलेची दोन तोळे ३ मिली वजनाची लगड ओरबाडून नेली होती. तसेच ब्रिजकिशोर रामप्रसाद तिवारी यांच्या कडील अर्धा तोळ्याचे मंगळसूत्र, अभिषेक बाळासाहेब सोनवणे यांच्या कडील सव्वा तोळे वजनाची सोन्याची लगड व विजय यशवंत गांगुर्डे यांचा मोबाईल चोरी गेला होता.
नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. घराबाहेर पडताना आपल्या शेजारी किंवा गावाला जाताना आपल्या जवळच्या पोलीस ठाण्यात आपण बाहेर आत जात असल्याची सूचना दिल्यास चोरीच्या प्रकारावर मोठ्या प्रमाणात आळा बसू शकतो. त्याचबरोबर महिलांनी फिरतांना आपले गळ्यातील दागिने सांभाळून बाळगले पाहिजे. दुचाकी वापरताना तिला आधुनिक पद्धतीत आलेल्या सिस्टीमचा वापर करून ती सुरक्षित कशा पद्धतीने राहील याचे गांभीर्य ठेवणे गरजेचे असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांनी सांगितले व उपस्थितांना मार्गदर्शन केले. किशोर दादिया यांनी व्यसनमुक्तीची शपथ देऊन व्यसनामुळे आपले शरीराचे होणारे नुकसान, कुटुंबाचे नुकसान यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर तर सूत्रसंचालन व आभार पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी केले.