नवी दिल्ली (भ्रमर वृत्तसेवा) :– चुकीच्या पद्धतीने पार्किंग करणार्याला एक हजार रुपये दंड करण्याचा तसेच अशा चुकीच्या पार्किंग केलेल्या वाहनाचा फोटो काढून पाठवणार्याला वरील रकमेपैकी 500 रुपये बक्षिस देण्यासंबंधी नवा कायदा आणण्याचा विचार करत असल्याचे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सूचित केले आहे. मात्र हा विचार खरोखरच मनावर घेतला आहे की, प्रत्यक्ष अंमलबजावणी करणार आहे, हा चर्चेचा मुद्दा ठरला आहे.

दिल्लीमध्ये आयोजित इंडस्ट्रियल डेकार्बोनायझेशन समिटमध्ये बोलताना त्यांनी पार्किंग ही फार मोठी समस्या असल्याचे सांगितले. त्यानंतर दंडाविषयी वक्तव्य करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. मोठे घर बांधल्यानंतर खाली पार्किंगसाठीही जागा बनवा, असा सल्ला यावेळी गडकरींनी दिला. माझ्या नागपुरातील घरी 12 गाड्यांसाठी अंडरग्राऊंड पार्किंग आहे. मी रस्त्यावर गाडी उभी करत नाही, अशी माहिती यावेळी गडकरींनी दिली.

नितीन गडकरी यांनी आपल्या युट्यूब अकाऊंटवर व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी त्यांनी सार्वजनिक वाहतुकीमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर गरजेचा असल्याचे सांगितले.
प्रत्येक व्यक्ती गाडी घेत आहे. माझ्या नागपुरातील घऱी स्वयंपाक करणार्याकडेही दोन गाड्या आहेत. याआधी अमेरिकेत सफाई करणारी महिला गाडीतून यायची, तेव्हा आपण आश्चर्याने पाहायचो. पण आता आपल्याकडेही तेच होत आहे. कुटुंबात चार माणसे आणि सहा गाड्या असतात. दिल्लीवाले तर नशिबवान आहेत, कारण आम्ही रस्ते त्यांच्या पार्किगसाठी तयार केले आहेत. कोणीही पार्किंग तयार करत नाही, सगळे रस्त्यावर गाडी उभी करतात, अशी खंत यावेळी गडकरींनी बोलून दाखवली.