खड्ड्यांमुळे नाशिक-मुंबई व नाशिक-पुणे मार्गांवर वाहतूक संथ गतीने

नाशिक (प्रतिनिधी)- नाशिक-मुंबई महामार्गावर असलेल्या खड्ड्यांमुळे नाशिक आणि मुंबईचा वाहनांचा स्पीड अतिशय संथ गतीने सुरू आहे. त्याचा परिणाम जनजीवनावर तसेच वाहतुकीवर देखील झाला आहे.

मागील आठवड्यात पुनर्वसू नक्षत्राच्या झालेल्या जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. त्यातच नाशिक-मुंबई आणि नाशिक-पुणे या दोन राष्ट्रीय महामार्गांची दैना झाल्यामुळे त्याचा थेट परिणाम पाऊस थांबल्यानंतर देखील जनजीवनावर होताना दिसून येत आहे. पावसाच्या जोर ओसरला असला तरी नाशिकचा मुंबईशी असलेला संपर्क अतिशय संथ गतीने सुरू आहे.

त्यामुळे मोठ्या प्रमाणावर व्यापारी नागरिक आणि प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मुंबईला जाण्यासाठी नाशिक हा एक मोठा मार्ग आहे परंतु या मार्गावर नाशिक नंतर थेट ठाण्यापर्यंत मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. या महामार्गावर अतिशय संथ गतीने वाहतूक सुरू आहे. तीन तीन तास वाहतूक एकाच जागेवर थांबून असल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याचाच परिणाम म्हणून नाशिकहून मुंबईला जाणारा भाजीपाला दूध आणि इतर आवश्यक वस्तूंवर झाला आहे तर मुंबईवरून नाशिकला येणाऱ्या वृत्तपत्र व इतर साहित्याच्या वाहतुकीवर देखील मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. महामार्गावर असलेल्या खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे मालवाहतूकदार देखील त्रस्त झाले आहेत.

अशीच अवस्था नाशिक-पुणे महामार्गावर आहे. पुणे महामार्गावर नाशिक सिन्नर महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे नाशिक पुणे महामार्गावर देखील वाहतूक करणाऱ्या प्रवासी आणि मालवाहतूकदारांना किमान एक तास तरी एका जागेवर थांबण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नाशिक पुणे संपर्कावर देखील याचा परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!