थकीत कर असलेल्या वाहनांचा 7 जून रोजी होणार जाहीर ई-लिलाव

 

नाशिक :- प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक येथे मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यात जप्त केलेल्या वाहनांचा 7 जून 2022 रोजी सकाळी 11.00 वाजात जाहीर ई-लिलाव करण्यात येणार आहे. याअनुषंगाने थकीत कर असलेल्या वाहन मालकांना 6 जून 2022 पर्यंत वाहन कर व पर्यावरण कर भरण्यासाठी संधी देण्यात येत आहे, अशी माहिती कराधान प्राधिकारी तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदिप शिंदे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमुद केल्यानुसार, या जाहीर ई-लिलावात सहभागी होण्यासाठी 31 मे 2022 ते 5 जून 2022 या कालावधीत सकाळी 11.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत www.eauction.gov.in या संकेत स्थळावर तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक येथे 62 हजार 200 रूपये रक्कमेचा RTO, NASHIK या नावाने अनामत धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट) सह नाव नोंदणी करून प्रत्यक्ष उपस्थित राहून कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. तसेच या जाहीर ई-लिलावात 42 वाहनांचा लिलाव होणार असून बस, ट्रक, टॅक्सी, हलकी मालवाहू वाहने, व ऑटोरिक्षा या वाहनांचा समावेश आहे. या लिलाव प्रक्रियेत उपलब्ध जीएसटी धारकांनाच सहभाग घेता येणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी, असेही कराधान प्राधिकारी तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदिप शिंदे यांनी सांगितले आहे.

वायुवेग पथकाने वेळोवेळी विविध गुन्ह्याखली अटकवून ठेवलेल्या वाहनांच्या मालकांना कर अदा करण्यासाठी त्यांच्या नोंदणीकृत पत्‍त्यावर पोचदेयक टपालाने नोटीस देण्यात आली आहे. लिलाव करण्यात येणारी वाहने नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक पेठरोड येथील राज्य परिवहन महामंडळ कार्यशाळा, सिन्नर बस डेपो व बस स्टँड, बोरगाव सिमा तपासणी नाका, येवला बस डेपो, पिंपळगाव बसवंत बस डेपो येथे पाहणी करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या जाहीर ई- लिलावाची प्रक्रिया कोणतेही कारण न देता तहकूब करण्याचा अधिकार उप प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा कर वसुली अधिकारी यांना देण्यात आला आहे. सदरचा जाहीर ई-लिलाव 7 जून 2022 रोजी www.eauctiom.gov.in या संकेत स्थळावर सकाळी 11.00 ते 4.00 या कालावधीत होणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक येथे उपलब्ध करून देण्यात आली असून वाहने जशी आहेत तशी या तत्वावर जाहीर ई- लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार आहे, असेही माहिती कराधान प्राधिकारी तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. शिंदे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!