पाटणा (भ्रमर वृत्तसेवा):– सैन्य दलातील भरतीसाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेविरोधात देशभरात अनेक ठिकाणी आंदोलन सुरू आहे. बिहारमध्ये या आंदोलनाला आता हिंसक स्वरुप प्राप्त झालं असून लखीसरायमध्ये एका रेल्वेला आंदोलकांनी आग लावली. या आगीत रेल्वेचे 12 डबे जळून खाक झाले असून त्यामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे.

अग्निपथ योजनेच्या विरोधात आंदोलन करणार्या आंदोलकांकडून रेल्वे गाड्यांना आग लावण्याच्या घटना घडत आहेत. यावर आता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आंदोलकांना शांतता राखण्याचं तसेच रेल्वेंना आग न लावण्याचे आवाहन केले आहे. या आंदोलनामुळे उत्तर भारतातील जवळपास 200 गाड्या रद्द करण्याची घोषणा रेल्वे खात्याकडून करण्यात आली आहे.
अग्निपथ योजना म्हणजे काय?

नव्या योजनेनुसार ही सैन्य भरती चार वर्षांसाठी असणार आहे. चार वर्षांनंतर सैनिकांच्या सेवांचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर काही सैनिकांची सेवा वाढवली जाऊ शकते. तर बाकीचे सैनिक निवृत्त होतील. या चार वर्षांच्या नोकरीमध्ये सहा आणि नऊ महिन्यांचे प्रशिक्षण देखील असणार आहे. चार वर्षांच्या निवृत्तीनंतर या सैनिकांना पेन्शन मिळणार नाही. परंतु, एकरकमी रक्कम दिली जाईल, अशी माहिती आहे.