नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. निवडणुकीची अधिसूचना 5 जुलै रोजी जारी करण्यात येणार आहे. 19 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून निवडणुकीसाठी 6 ऑगस्ट ही तारीख निश्चित केली आहे.

याआधी राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. एनडीएने महिला आदिवासी नेत्या द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी दिली असून यूपीएने यशवंत सिन्हा यांना संयुक्त उमेदवार म्हणून उमेदवारी दिली आहे. दोन्ही उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. येत्या 22 जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक पार पडणार आहे.
व्यंकय्या नायडू यांचा उपराष्ट्रपती म्हणून कार्यकाळ 10 ऑगस्ट 2022 रोजी संपत आहे. घटनेच्या कलम 68 नुसार उपराष्ट्रपतीचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी या पदासाठी निवडणूक घेणे आवश्यक आहे. आज मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडे आणि अन्य पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर उपराष्ट्रपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली आहे.