रामकुंड परिसरातील सर्वच मंदिरे पाण्याखाली; कपालेश्‍वर मंदिराच्या पायर्‍यांना लागले पाणी

नाशिक (राजन जोशी) :- शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रामकुंड परिसरातील सर्वच मंदिरे पाण्याखाली गेली असून, कपालेश्‍वर मंदिराच्या पायर्‍यांपर्यंत पुराचे पाणी पोहोचले आहे.

या पुराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. पावसामुळे फुलांची आवक कमी झाल्याने आणि त्यातच उद्या गुरुपौर्णिमा असल्यामुळे फुल बाजारात फुलांचा भाव वाढलेला दिसून आला. सकाळी काही वेळ पावसाने उघडीप घेतली असल्याने पूर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले.

नाशिक शहरात दोन दिवसापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे गंगापूर धरण हे 65 टक्क्यांहून अधिक भरले आहे. पहिल्याच पावसात एवढ्या मोठ्या प्रमाणात धरण भरलेले असल्यामुळे काल दुपारपासून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. रात्रीपर्यंत सुमारे दहा हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग धरणातून करण्यात आला. त्याचबरोबर पाऊसही सुरू असल्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होत होती. यावर्षीच्या पहिल्याच पुरामुळे गोदावरी काठी असलेल्या कपालेश्वर मंदिराच्या दोन पायर्‍या पाण्याखाली बुडाल्या. तर रामकुंड परिसरातील अति प्राचीन गोदावरी मंदिरासह सर्वच मंदिरे पाण्याखाली गेल्याचे दिसून आले आहे. गोदावरी नदीच्या काठावर असणार्‍या बेघर तसेच अन्य लोकांना महापालिकेच्या वतीने सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. त्याचबरोबर नदीकडे येणारे मालेगाव स्टँड, इंद्रकुंड समोरील उतार, कपालेश्वर जवळील रस्ता, गोरेराम मंदिराचा रस्ता, सरदार चौकातील रस्ता, तसेच कापड बाजार व दहिपुल या सर्व ठिकाणी महापालिकेच्या वतीने सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहे. नदीच्या पाण्याजवळ कोणीही जाणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत मुसळधार पाऊस सुरू असल्याने नागरिक घराबाहेर पडले नव्हते, परंतु आज सर्व शाळांना सुट्टी असल्याने आणि सकाळपासूनच पावसाने काही वेळ उघडीप दिल्याने हा पूर पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती.

नदीच्या काठावरील गणेशवाडी परिसरात दररोज भरणारा फुल बाजार हा आज कमी प्रमाणात दिसून आला. शहराच्या लगतच्या भागातून येण्यास शेतकर्‍यांना अडचण होत असल्याने फुल बाजारात आज फुलांची आवक अत्यल्प दिसून आली. त्यातच उद्या गुरुपौर्णिमा असल्यामुळे फुलांचा भाव वधारलेला दिसून आला.

नाशिक शहरात झालेल्या या पहिल्याच पावसात अशा प्रकारचा पूर येईल, अशी अपेक्षा कोणालाही नव्हती. परंतु अचानक आलेल्या या पुरामुळे नदीकाठी व्यवसाय करणार्‍या व्यापार्‍यांचे अतोनात हाल झाल्याचे दिसून आले. अचानकपणे पूर आल्यामुळे आपले दुकाने त्याचबरोबर दुकानातील साहित्य हलवण्यासाठी व्यापार्‍यांना मोठी धावपळ करावी लागल्याचे दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!