नाशिक (प्रतिनिधी):- त्र्यंबकेश्वर येथून प्रस्थान केलेल्या संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे आज सकाळी स्वागत समितीच्यावतीने त्र्यंबकरोडवरील पंचायत समितीच्या कार्यालयात स्वागत करण्यात आले.

यावेळी त्र्यंबकेश्वर ते सोलापूरपर्यंत स्वतंत्र पालखी मार्ग तयार करण्याबाबत शासनाला प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले.

त्र्यंबकेश्वर येथून पंढरपुर येथे दरवर्षी संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी काढण्यात येते. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे हा पालखी सोहळा व्यापक स्वरूपात न झाल्याने यंदा वारकर्यांमध्ये चांगलाच उत्साह दिसून आला. सातपूर येथे मुक्काम झाल्यानंतर ही पालखी आज पुढील प्रवासाला निघाली.
या पालखीचे नाशिककरांच्यावतीने स्वागत करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या व्यासपिठावर विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त सुरेश खाडे, माजी आमदार बाळासाहेब सानप, लक्ष्मण सावजी, आ. हिरामण खोसकर, अमृता पवार, स्वागत समितीचे भाऊसाहेब गंभीरे आदी उपस्थित होते. सुरुवातीला पालखीत सहभागी होणार्या दिंडीच्या प्रमुखांसह वीणावादक व मानकर्यांचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर हभप मोहन महाराज बेलापूरकर, हभप हरीभक्त देहुकर महाराज, बाळकृष्ण महाराज डावरे यांच्यासह मानकर्यांचा सन्मान करण्यात आला. यानंतर मान्यवरांच्या हस्ते पालखीचे पुजन करण्यात आले.
यावेळी बोलतांना विभागीय आयुक्त गमे यांनी सांगितले की, अनेक वर्षांपासूनची परंपरा असलेल्या या त्र्यंबकेश्वरपासून निघणार्या या पालखीचे महत्व आहे. या मानाच्या पालखीसाठी येत्या काळात त्र्यंबकेश्वर ते सोलापूरपर्यंत स्वतंत्र पालखी मार्ग करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. यासाठी नाशिक, अहमदनगर, सोलापूर या ठिकाणच्या जिल्हाधिकार्यांची याबाबत लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. या जिल्हधिकार्यांशी चर्चा झाल्यानंतर त्याबाबत स्वतंत्र पालखी मार्गाचा प्रस्ताव तयार करून शासनाला पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर आ. खोसकर यांनीही यासाठी आम्ही पाठपुरावा करू असे सांगितले. त्यानंतर ही पालखी पुढील मार्गासाठी मार्गक्रमण झाली. जलतरण तलाव याठिकाणी सिटीलिंक प्रशासनाच्या वतीने स्वागत करून वारकर्यांना अल्पोपहार वाटप करण्यात आला.
पालखी स्वागतासाठी पद्माकर पाटील, मुरलीधर पाटील, त्र्यंबकराव गायकवाड, पुंडलीकराव थेटे, सचिन डोंगरे, अरुण पवार, रत्नाकर चुंभळे, महंत सुधीरदास पुजारी, ज्ञानेश्वर नागपुरे, दामोदर गावले, शाम पिंपरीकर, रमेश कडलग, राजेंद्र सैनी, संपतराव धोंगडे, राहुल बर्वे, सुनिल फरताळे, विलास थोरात, धनंजय पुजारी, माणिक देशमुख, प्रियंका कानडे, माजी नगरसेवक तानाजी जायभावे, अण्णा पाटील, समाधान जायभावे आदींसह मान्यवर उपस्थित होते. पालखी आज जुने नाशिक-नामदेव विठ्ठल मंदिरात मुक्कामी थांबणार असून याठिकाणी नाशिककरांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.