कर्नाटक विधानसभेच्या निकालाचे परिणाम राज्यातही दिसू लागले आहे. कर्नाटकच्या निकालानंतर महाविकास आघाडी बैठकांचा सिलसिला वाढला आहे. आगामी निवडणुकांची तयारी जोमाने सुरु करण्यात आली आहे. दर दुसरीकडे भाजपने कर्नाटकच्या पार्श्वभूमीवर सावध पवित्रा घेत राज्यातील पक्ष आणखी मजबूत करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.
राज्य कार्यकारिणीच्या बैठकीनंतर महाराष्ट्र भाजपामध्ये मोठ्या फेरबदलाचे वारे वाहू लागले आहेत. भाजपकडून संघटनात्मक पातळीवर सर्व पदाधिकाऱ्यांची फेरनियुक्त्या केल्या जाणार असल्याचं बोललं जात आहे. आगामी निवडणुकांचा विचार करुन भाजप वेगळ्या प्रकारची रचना करण्याचा विचार करत आहे.
दरम्यान राज्यातील भाजपचे ७० टक्के जिल्हाध्यक्ष बदलले जाणार आहे. तरुण पदाधिकाऱ्यांना जिल्हास्तरावर संधी भाजपकडून दिली जाणार आहे. जुन्या जिल्हाध्यक्षांच्या अनुभवानुसार त्यांची लोकसभा निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती केली जाणार आहे.
जुन्या जिल्हाध्यक्षांना लोकसभा मतदारसंघ बांधणीची जबाबदारी दिली जाणार आहे. तालुकाध्यक्ष आणि इतर महत्त्वपूर्ण पदाधिकाऱ्यांच्या नव्याने नेमणुका होणार आहेत. भाजपकडून जिल्हानिहाय संघटनात्मक दृष्टीने पक्षांतर्गत पालकमंत्र्यांची घोषणा केल्या जाणार आहेत. तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २८८ मतदारसंघात नव्या नियुक्त्या दिसण्याची शक्यता आहे.