मुंबई (भ्रमर वृत्तसेवा) :- मास्क सक्तीविषयी चर्चा सुरू असली, तरी राज्यात मास्कसक्ती नसल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबई, पुणे, पालघर आणि रायगडचा काही भाग, ठाणे या भागात थोडीफार संख्या वाढत आहे. त्याला अनुसरून देशाच्या केंद्रीय आरोग्य विभागाच्या लोकांनी पत्र पाठवले आहे की या विभागांसाठी तुम्हाला रुग्णसंख्या वाढ रोखण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतील. त्या बाबतीत परवा टास्क फोर्सच्या बैठकीत स्पष्टपणे ठरले की जिथे गर्दीची ठिकाणे आहेत, तिथे मास्क वापरण्याचं आवाहन करावे. ते सक्तीचे नाही, असे टोपे म्हणाले.

महाराष्ट्रात पुन्हा एकदा मास्क सक्ती लागू करण्यात आल्याची चर्चा सुरू झाली होती. यासंदर्भात एक सूचना पत्र देखील व्हायरल होत असून त्यावरून राज्यात पुन्हा एकदा मास्क सक्ती लागू करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. माध्यमांशी बोलताना राजेश टोपे यांनी मास्कबाबत राज्य सरकारचे नेमके आवाहन काय आहे, याविषयी सविस्तर भूमिका मांडली आहे.
10 ते 15 दिवस जी सध्या रुग्णवाढ झाली आहे त्या दृष्टीकोनातून गर्दीच्या बंदिस्त ठिकाणी मास्क वापरावा. खुल्या ठिकाणी त्यात शिथिलता असली तरी हरकत नाही. त्याला जोडून लसीकरण, बूस्टर डोस घ्यायला हरकत नाही अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे चाचण्या वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाकडून तीन पानांची नोट काढण्यात आली असून ती सर्व जिल्हाधिकार्यांना देण्यात आली आहे, असे स्पष्टीकरण राजेश टोपे यांनी दिले आहे.
दरम्यान, पुढील 15 ते 20 दिवस परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच मास्क सक्तीबाबत निर्णय घेतला जाईल, असे देखील राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. 15 ते 20 दिवस आपण परिस्थितीचा आढावा घेऊयात. त्यानंतर मास्कबाबत सक्ती करायची की नाही? याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे राजेश टोपे यावेळी म्हणाले.