नाशिक (प्रतिनिधी) :- शेअर मार्केटमध्ये दिलेली रक्कम गुंतवणूक न करता विश्वासघात करून सासवडच्या महिलेला एका भामट्याने साडेबासष्ट लाख रुपयांना फसविल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आरोपी प्रसन्नकुमार नानाजी जगदाळे याने फिर्यादी स्मिता बाळासाहेब शिवरकर (वय 32, रा. सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे) हिच्यासोबत झालेल्या ओळखीचा फायदा घेऊन फिर्यादी शिवरकर यांच्या आईच्या उपचाराची तरतूद होईल, तसेच फिर्यादीसोबत लग्न करून नवीन फ्लॅटमध्ये आईला सांभाळू, असे सांगितले. त्यामुळे शिवरकर यांचा आरोपी जगदाळे याच्या बोलण्यावर विश्वास बसला. त्यानंतर “तुम्ही शेअर मार्केटचे खाते सुरू केल्यास मोठा फायदा होईल,” असे सांगून फिर्यादी महिला, तिची आई व मावशी यांना खाते खोलण्यास भाग पाडले.
त्यानंतर इतर नातेवाईकांच्या खात्यावर रक्कम डिपॉझिट करण्यास सांगितले. त्यानंतर शेअर मार्केटमध्ये केलेल्या गुंतवणुकीत प्रत्यक्षात तोटा झालेला असतानादेखील 50 लाख रुपयांचा नफा झाल्याची खोटी माहिती फिर्यादी महिलेला दिली. त्यानंतर 19 लाख 97 हजार 644 रुपये त्याचे ब्रोकरेज म्हणून फिर्यादी महिलेकडून घेतले, तसेच डिसेंबर 2018 ते जानेवारी 2019 यादरम्यानच्या कालावधीत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी घेतलेली 38 लाख 6 हजार 850 रुपयांची रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतविली नाही. या रकमेतून फ्लॅट घेऊन तो फिर्यादी महिलेच्या नावावर करण्यास नकार दिला. त्यानंतर महिलेकडून आरोपी जगदाळे याने वारंवार घेतलेली 4 लाख 42 हजार रुपयांची रक्कम परस्पर हडपली.
हा प्रकार दि. 1 ऑगस्ट 2018 ते दि. 31 ऑगस्ट 2021 दरम्यान शरणपूर रोड येथे घडला. या प्रकरणात आरोपीने फिर्यादी महिलेकडून वारंवार सुमारे 62 लाख 46 हजार 494 रुपयांची रक्कम घेऊन महिलेचा विश्वासघात करून तिची फसवणूक केली. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात प्रसन्नकुमार जगदाळे याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कोल्हे करीत आहेत.