नाशिक (प्रतिनिधी) :- फ्लॅट भाडेतत्त्वावर देण्याचे भासवून अॅडव्हान्स म्हणून बँक खात्यात पैसे टाकण्यास सांगून महिलेला एक लाख रुपयांना गंडा घालणार्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी राजकुमार मेहेरचंद यादव (वय 40, रा. चुसूल मार्ग, स्कूल ऑफ आर्टिलरी, देवळाली कॅम्प) यांना आरोपी मनजित (रा. रेवडी, हरियाना) याने 9348320255 या क्रमांकावरून फोन केला. तुमची फ्लॅटची जाहिरात आवडली असून, फ्लॅट भाडेतत्त्वावर द्यायचा असल्याचे भासविले. त्यासाठी अॅडव्हान्स पेमेंटपोटी यादव यांचे बँक डिटेल्स मागवून यादव यांच्या पत्नीला अकाऊंट अॅड करण्यास सांगितले.
प्रोसेसिंगमधील पैसे परत येण्यासाठी नेट बँकिंगद्वारे फिर्यादी यादव यांच्या पत्नीला त्यांच्या अकाऊंटवरून फेडरल बँकेच्या 99980119322688 या क्रमांकाच्या खात्यावर 99 हजार 998 रुपये पाठविण्यास सांगून फसवणूक केली. हा प्रकार दि. 28 ते 31 मे या कालावधीत घडला. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात मनजित याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाडवी करीत आहेत.