नाशिक :- मोलमजूरी करणाऱ्या एका महिलेने आज दुपारी जुल्या मुलींना रस्त्याच्या कडेलाच जन्म दिला व तेथील माजी नगरसेविका प्रियंका माने व त्यांचे पती धनंजय माने यांच्या सतर्कतेमुळे ती महिला व तिचे दोन्ही बाळ सुखरूप आहेत.
आज दुपारी १२:५६ वाजता औदुंबर नगर, अमृतधाम येथील रस्त्यावरून मोलमजुरी करणारी शितल विकी कांबळे ही गरोदर महिला जात असतांना त्या महिलेच्या पोटात कळा सुरू झाल्या. ती महिला रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाखाली बसली व तेथेच डिलिव्हरी झाली. परिसरातील महिलांनी व नागरिकांनी जवळच असलेले डॉ.राजेंद्र बोरसे व प्रभागाच्या नगरसेविका सौ. प्रियंकाताई धनंजय माने यांना फोन केला.
डॉ. राजेंद्र बोरसे हे त्यांच्या क्लिनिकमध्ये असलेले पेशंट सोडून तत्काळ ज्या ठिकाणी महिला डिलिव्हरी झाली त्या ठिकाणी पोहोचले. त्या महिलेची डिलिव्हरीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली. त्या महिलेने दोन जुळ्या गोंडस मुलींना जन्म दिला. तोपर्यंत प्रभागाच्या नगरसेविका माने या प्रभागात असलेले मनपाचे आरोग्य केंद्र इथून डॉ. बेस्ते व दोन महिला परिचारिका वैशाली धिवर, छाया जाधव यांना आपल्या वाहनात तत्काळ घेऊन सदर महिला ज्या ठिकाणी डिलिव्हरी झाली त्या ठिकाणी पोहोचल्या व पंचवटी वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय देवकर यांना फोन करून डॉ.राजेंद्र बोरसे यांचे बोलणे करून दिले.
https://ashishprovision.com/shop?category=shravan-somwar-special
डॉ. राजेंद्र बोरसे यांनी हा घडलेला प्रकार डॉ.विजय देवकर यांना सांगितला. लोकमान्य हॉस्पिटलची ॲम्बुलन्स बोलवून त्या महिलेला इंदिरा गांधी रुग्णालय येथे पाठविण्यात आले. डिलिव्हरी झालेली महिला शितल विकी कांबळे व तिने जन्म दिलेल्या दोन्ही जुळ्या मुली या सुखरूप आहेत.
तत्काळ डॉ.राजेंद्र बोरसे व सौ. माने हे तिथे आले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी मदतीला भामरे आजी, कोलते ताई, वानखेडे ताई, जाधव ताई, विलास कारेगावकर, ज्ञानेश्वर सोमासे, मनोज कोलते, रमेश वानखेडे व परिसरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने आल्या होत्या.