नाशिक (प्रतिनिधी) :- मासे खरेदी करताना किमतीवरून झालेल्या वादातून मासे विक्रेत्या महिलेला अंडारोल विक्रेत्या तरुणाने मारहाण केल्याची घटना अंबड येथे घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी ज्योती सुकदेव कराटे (वय 43, रा. महालक्ष्मीनगर, अंबड) ही महिला महालक्ष्मीनगर येथे लॉर्ड बेकरीसमोर मासे विक्रीचा व्यवसाय करते. या महिलेच्या शेजारीच सागर परदेशी (वय 32, पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) याचा अंडारोल विक्रीचा गाडा आहे.
काल सायंकाळी साडेपाच वाजता सागर परदेशी याने मासे खरेदी करताना किमतीवरून फिर्यादी महिलेशी वाद घातला व दारू पिऊन महिलेला शिवीगाळ करून गाडीवरील मासे कापण्याच्या कोयत्याने महिलेच्या डाव्या डोळ्यावर मारून दुखापत केली.
या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात महिलेच्या फिर्यादीनुसार सागर परदेशीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार राऊत करीत आहेत.