नाशिक (प्रतिनिधी) :- लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित करून लग्नास नकार देणार्या तरुणाविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे, की आरोपी रमेश कांतीलाल कामडी (वय 32, मु. पो. करंजाळी, ता. पेठ, जि. नाशिक) याने तीन वर्षांपासून पीडित महिलेसोबत ओळख निर्माण केली. तुझ्यासोबत लग्न करणार आहे, असे खोटे सांगून लग्नाचे आमिष दाखविले. दि. 1 जानेवारी 2019 ते 20 मे 2022 या कालावधीत सिडकोतील घरी पीडित महिलेशी अंगलट करून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या प्रकारानंतर पीडित महिलेने लग्नाविषयी विचारणा केली असता आरोपी रमेश कामडी याने शिवीगाळ व मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली.

या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी कामडीविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बिडकर करीत आहेत.