नाशिकरोड (प्रतिनिधी) :- येथील गोरेवाडी शास्त्रीनगर परिसरातील चिडे मळ्यात एका 20 वर्षीय युवतीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत शेतमालक सोमनाथ चिमणराव जाधव (वय 57, रा. गोरेवाडी) यांनी मंगळवारी नाशिकरोड पोलिसांना खबर दिली, की त्यांच्या एकलहरा रोडवरील उसाच्या शेतात अंदाजे 20 ते 25 वर्षे वयाच्या तरुणीचा मृतदेह आढळला आहे. ऊसतोड कामगार ऊस तोडण्यासाठी गेले असता हा मृतदेह आढळून आला. मृतदेहावर कोणत्याही जखमा नसल्या, तरी गळ्यात गाठ मारून ओढणी बांधलेली दिसून आली, तसेच तरुणीचे निधन होऊन दोन-तीन दिवस झालेले असल्यामुळे मृतदेह कुजण्यास सुरुवात झाली होती.
याबाबत पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पोस्ट मार्टेमसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला आहे. मृतदेह आढळलेला परिसर निर्मनुष्य असल्यामुळे ही आत्महत्या की आणखी काही याबाबत परिसरात चर्चा होत आहे. पुढील तपास नाशिकरोड पोलीस करीत आहेत.