अतिरेक्यांच्या गोळीबारात एका परप्रांतीय मजुराचा मृत्यू

श्रीनगर (भ्रमर वृत्तसेवा) :- जम्मू-काश्मीरमध्ये सर्वसामान्य आणि हिंदू व्यक्तींवर होणारे दहशतवादी हल्ले सुरूच आहेत. काल बडगाममध्ये वीटभट्टीवर काम करणार्‍या परप्रांतीय मजुरांवर अतिरेक्यांनी गोळीबार केल्यामुळे 1 कामगाराचा मृत्यू झाला. तर एक मजूर गंभीर जखमी झाला आहे. जखमी मजुरावर श्रीनगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बडगाम मगरेपोरा चडूरा भागात दहशतवाद्यांनी मजुरांवर हा हल्ला केला. या हल्ल्यात दिलखुश नावाचा बिहारी मजुर ठार झाला. तर राजन नावाचा पंजाबी मजुर जखमी झाला.

काश्मिरी अतिरेक्यांचे हिंदू जनतेवर गोळीबार व हल्ले सुरूच आहेत. त्यात एका बँक मॅनेजरसह एका महिलेचा मृत्यू झाला आहे. असे हल्ले सुरू असल्यामुळे काश्मीर खोर्‍यातील हिंदू जनतेने आपली परराज्यात सोय करावी, सरकारी कर्मचारी असेल अशा हिंदूंची परराज्यात बदली करावी, अशी मागणी केली आहे. तर काही भागातून हिंदू रहिवाशांनी स्वत:च पलायन करणे सुरु केले आहे.
काश्मिरी अतिरेक्यांनी 2 मार्च 2022 रोजी कुलगाममधील संदू येथे दहशतवाद्यांनी पंचायत सदस्याची गोळ्या घालून हत्या केली. 31 मे रोजी कुलगाममधील गोपालपोरा येथे एका हिंदू शिक्षकाची गोळ्या झाडून हत्या केली. 25 मे रोजी काश्मिरी टीव्ही कलाकार अमीरा भट्ट यांची गोळ्या झाडून हत्या केली. 24 मे रोजी दहशतवाद्यांनी पोलीस कर्मचार्‍याची गोळ्या झाडून हत्या केली. या हल्ल्यात सात वर्षांची मुलगी जखमी झाली आहे. 17 मे रोजी बारामुल्ला येथील एका वाईन शॉपवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकला. या हल्ल्यात रणजित सिंह यांचा मृत्यू झाला. या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. 12 मे रोजी काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांची बडगाममध्ये गोळ्या झाडून हत्या. दहशतवाद्यांनी त्यांच्या कार्यालयात घुसून गोळीबार केला. याच दिवशी पुलवामा येथे पोलीस शिपाई रियाझ अहमद ठाकोर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. 9 मे रोजी शोपियानमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक नागरिक ठार. यात एका जवानासह दोघे जखमी झाले. याप्रमाणे दर दोन-तीन दिवसाआड काश्मिरी अतिरेक्यांचे हल्ले सुरू असल्यामुळे काश्मिर खोर्‍यातील हिंदू व परप्रांतीय जनता भयभीत झाली आहे.

काश्मीरमध्ये ठरवून करण्यात येत असलेले हत्यासत्र थांबत नसताना, खोर्‍यात नेमणूक करण्यात आलेल्या शेकडो सरकारी कर्मचार्‍यांनी आपली गृहजिल्ह्यात बदली करावी, या मागणीसाठी गुरुवारी जम्मूत मोर्चा काढला. निदर्शकांच्या हाती त्यांच्या मागण्यांचे फलक आणि त्यांच्या सहकारी रजनी बाला यांची छायाचित्रे होती.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!