नवी दिल्ली : रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) आणि याचे अध्यक्ष खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटू आक्रमक झाल्या आहेत. जोपर्यंत लैंगिक शोषण करणाऱ्या लोकांवर कारवाई केली जाणार नाही तोपर्यंत एकही खेळाडू आगामी स्पर्धांमध्ये सहभागी होणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. दिल्लीच्या जंतरमंतर मैदानामध्ये या खेळाडूंचे निषेध आंदोलन सुरु आहे.
दरम्यान, भारतीय कुस्ती महासंघातील खेळाडू सध्या जंतरमंतरवर धरणे आंदोलन करत आहेत. यामध्ये साक्षी मलिक, बजरंग पुनिया, यांच्यासह विनेश फोगाटचा देखील सहभाग आहे. भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट आणि साक्षी मलिक यांनी रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (WFI) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

आपल्या खासगी आयुष्यात कुस्ती फेडरेशन ढवळाढवळ करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आम्हाला त्रास दिला जातोय, तसेच आमचा छळ होत आहे, त्याचबरोबर आम्हाला धमक्या देखील दिल्या जात आहेत, असा आरोप भारतीय कुस्तीपटूंकडून केला जात आहे. त्यामुळे सध्या मोठा गोंधळ उडाल्याचे पहायला मिळत आहे.
विनेश फोगाटने सांगितले की…
महिला कुस्तीपटूंना लैंगिक शोषणाला सामोरे जावे लागलेल्या २० एक घटना मला माहिती आहेत. यामध्ये अनेक कोच आणि रेफरिंचा देखील समावेश आहे. जोपर्यंत या आरोपींना शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही निषेध आंदोलन करणार आहोत. एकही खेळाडू आगामी एकाही स्पर्धेत सहभागी होणार नाही”
साक्षी मलिक म्हणाली की…
संपूर्ण कुस्ती फेडरशन बदलले पाहिजे कारण भविष्यात नवे कुस्तीपटू सुरक्षित राहतील. नवे फेडरेशन अस्तित्वात यायला हवे. इथली घाण तळापर्यंत पोहोचली आहे. आम्ही याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बोलून यातील सखोल माहिती समोर आणणार आहोत. फेडरेशनमधील लैंगिक शोषणाच्या मुद्द्यावर चौकशी झालीच पाहिजे, अशी भूमिका यावेळी ऑलिम्पकपटू साक्षी मलिक हीने मांडली आहे.
बजरंग पुनिया म्हणाला…
इथे आंदोलन करणाऱ्या महिला कुस्तीपटू या प्रतिष्ठीत कुटुंबातील आहेत. जर आमच्या बहिणी आणि मुली सुरक्षित नसतील तर हे खपवून घेतले जाणार नाही. फेडरेशनमध्ये बदल झाला पाहिजे ही आमची मागणी आहे, अशी प्रतिक्रिया ऑलिम्पिक मेडल विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया याने म्हटले आहे.
विनेश फोगाट म्हणाली की…
जर हायकोर्टाने आम्हाला निर्देश दिले तर आम्ही सर्व पुरावे सादर करु. आम्ही पंतप्रधानांकडे देखील सर्व पुरावे सादर करण्यास तयार आहोत, असे यावेळी विनेश फोगाट हीने म्हटले आहे.