नाशिक (प्रतिनिधी) :- शहर परिसरात वाहनचोरीचे सत्र सुरूच असून, वेगवेगळ्या ठिकाणांहून चार मोटारसायकलींची अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची नोंद विविध पोलीस ठाण्यांत करण्यात आली आहे.

मोटारसायकल चोरीचा पहिला प्रकार रामसेतू पुलाजवळ घडला. फिर्यादी भरत विष्णू भोईर (वय 40, रा. इंदूप्राईड, मखमलाबादरोड, पंचवटी) हे 2 जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजता रामसेतू पुलाखाली सातीआसरा मंदिराजवळ गेले होते. त्यावेळी त्यांनी एम.एच.15 सीजे 9611 या क्रमांकाची 15 हजार रुपये किंमतीची सीडी डिलक्स मोटारसायकल पार्क केली होती. ही मोटारसायकल अज्ञात चोरट्याने भोईर यांची नजर चुकवून चोरून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोेलीस हवालदार शेवाळे करीत आहेत.

मोटारसायकल चोरीची दुसरी घटना पोलीस कॉलनीत घडली. फिर्यादी ज्ञानेश्वर शिवराम घटे (वय 24, रा. विहंग सोसायटी, पोलीस कॉलनी शेजारी, आडगाव) यांनी एम.एच.15 जी.टी. 7678) या क्रमांकाची 30 हजार रुपये किंमतीची पल्सर मोटारसायकल घराच्या आवारात पार्क केली होती. ही मोटारसायकल अज्ञात चोरट्याने दि.6 ते 7 जुलै दरम्यान मध्यरात्री कधीतरी चोरुन नेली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस नाईक वाघ करीत आहेत.
मोटारसायकल चोरीचा तिसरा प्रकार रविवारकारंजा येथे घडला. फिर्यादी ओमप्रकाश दिनानाथ पंडित (वय 32, रा. शिवशक्ती चौक, सिडको, नाशिक) हे 30 जुन रोजी सकाळी 9 वाजता रविवार कारंजावरील गायधनी लेने येथे आले होते. त्यावेळी त्यांनी एम.एच.15 जीके 6664 या क्रमाकांची 40 हजार रुपये किंमतीची होंडा कंपनीची मोटारसायकल पार्क केली होती. ही मोटारसायकल अज्ञात चोरट्याने त्यांची नजर चुकवून चोरुन नेली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस नाईक गायकवाड करीत आहेत. मोटारसायकल
चोरीचा चौथा प्रकार मेनरोड येथे घडला. फिर्यादी संजय गणपत शिरसाठ (वय 42, रा. बुधवारपेठ, जुने नाशिक) हे 5 जुलै रोजी सकाळी 10 वाजता मेनरोडवरील जिजामाता हॉस्पिटल येथे गेले होते. त्यावेळी त्यांनी एम.एच.15 ईक्यु 3609 या क्रमांकाची 17 हजार रुपये किंमतीची मोटारसायकल हॉस्पिटलजवळ पार्क केली होती. ही मोटारसायकल अज्ञात चोरट्याने त्यांची नजर चुकवून चोरुन नेली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस नाईक महाले करीत आहेत.