नाशिकरोड (प्रतिनिधी):-राज्यात शिवसेनामध्ये झालेल्या बंडाळीच्या विरोधात शिवसैनिकांनी दंड थोपटले असून नाशिक मध्ये उद्या होत असलेल्या विराट मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शिंदे समर्थक व वैद्यकीय मदत कक्ष नाशिक जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख योगेश म्हस्के यांच्या कार्यालयाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.

नाशिक जिल्ह्यात शिवसेना बंडखोर नेते, मंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे योगेश म्हस्के यांनी शिंदे यांच्या समर्थनार्थ फेम सिग्नल जवळ फलक लावले होते. मूळ शिवसैनिकांनी ते लक्ष करीत शुक्रवारी दुपारी त्या फलकला काळे फासून गद्दार ही उपाधी दिली होती.

उपनगर पोलिसांचे पथकं पोहचताच या शिवसैनिकांनी तेथून काढता पाय घेतला. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. उद्या नाशिक शहरात जिल्ह्यातील बंडखोर आमदार मंत्री दादा भुसे व सुहास कांदे यांच्या विरोधात शिवसैनिकांचा विराट मोर्चा होणार आहे.
डॉ.आंबेडकरनगर समोरील योगेश म्हस्के यांच्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षचे संपर्क कार्यालय असून तिथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये ही खबरदारी घेत पोलीस खात्याने म्हस्के यांच्या कार्यालयावर एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एक उपनिरीक्षक व १५ कर्मचारी यांचा बंदोबस्त ठेवला आहे.