नवीन नाशिक :- कैऱ्या तोडण्यासाठी गेलेल्या युवकाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ८ वाजेदरम्यान इंदिरा नगर येथील राजसारथी सोसायटीत घडली.

अनिरुद्ध अनिल धुमाळ (वय ३०) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिरुद्ध धुमाळ आज सकाळी झाडावरील कैऱ्या तोडण्यासाठी आला होता. तो शिडीच्या सहाय्याने आंब्याच्या झाडावर चढला. झाडावर असताना त्याच्या हातातील लोखंडी पाईपचा स्पर्श झाडाजवळून गेलेल्या उच्चदाबाच्या विद्युत वहिनीला झाल्याने त्यास जोरदार विजेचा धक्का बसला.
त्या धक्क्याने तो झाडावरून खाली फेकला गेला. त्यात त्याला गंभीर दुखापत झाल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी इंदिरा नगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.