नाशिक (प्रतिनिधी) :- झूम ऍप वर ओळख करुन तरुणाचा विश्वास संपादित करत त्याला 2 लाख 75 हजार रूपयांना गंडा घातल्याची प्रकार उघड़किस आला आहे.
तसेच दरमहा किमान दहा टक्के परतावा मिळेल, असे आमिष दाखवून, तसेच 2 लाख 75 हजार रुपये रोख घेऊन त्याद्वारे प्लॅटिमा अल्टिमा हा बिटकॉईन गुंतवणूकदाराच्या नावाने घेतल्याचे भासवून प्रत्यक्षात एक रुपयासुद्धा परतावा दिला नाही. त्यामुळे फिर्यादी मंगेश अशोक मांडवडे (वय 32, रा. चिंचगव्हाण, ता. मालेगाव, व रामवाडी, आदर्शनगर, नाशिक) यांनी फसवणूक करणार्या आरोपींविरुद्ध मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. तीन संशयित आरोपींमध्ये एका जर्मनच्या व्यक्तीचा समावेश असल्यामुळे पोलीस तपासातून मोठे फसवणुकीचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.
फिर्यादी मंगेश मांडवडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार डिसेंबर 2021 ते दि. 8 जुलै 2022 दरम्यान संशयित आरोपी राजेंद्र उपाध्ये, योगेश भालेराव आणि जर्मनी येथील अॅलेक्स नावाची व्यक्ती अशा तिघांनी मिळून मांडवडे यांच्याकडून 2 लाख 75 हजार रुपयांची रोख रक्कम घेतली. या रकमेतून दरमहा दहा टक्के परतावा मिळेल, असे सांगितले होते, तसेच फिर्यादीच्या नावावर प्लॅटिमा अल्टिमा हे बिटकॉईन चलन खरेदी केल्याचे दाखविले, तसेच सुरत, सापुतारा व नाशिक यासह देशातील विविध ठिकाणी गुंतवणूकदारांचे सेमिनार घेऊन भारतीय रुपयाऐवजी डॉलर व युरो आदी विदेशी चलनांमध्ये गुंतवणूक करण्यास आरोपींनी प्रवृत्त केले; मात्र आजपर्यंत गुंतवणुकीतील एक रुपयादेखील परतावा मिळालेला नाही. त्यामुळे फसवणूक झाली म्हणून मांडवडे यांनी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.
पोलिसांनी भा. दं. वि. कलम 420, 34, तसेच ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम 1999 चे कलम 3 व 4 प्रमाणे आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणी अधिक तपास मालेगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील हे करीत आहेत.