नाशिक (प्रतिनिधी) :– सिन्नर तालुक्यातील नायगाव येथे आज पहाटे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक तरूण जखमी झाला आहे.
सोमनाथ मार्तंड वाबळे (वय 40, रा. नायगाव, सिन्नर) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. वाबळे हे आज सकाळी आपल्या घराजवळून जात असताना तेथेच दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढविला. बिबट्याने वाबळे यांच्या हातावर व मानेवर ओरबाडल्याने त्यांना जखमा झाल्या आहेत.
त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती समजताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्वरीत वाबळे यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविले. वनविभागाचे अधिकारी बिबट्याचा शोध घेत आहेत.