नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव शिवारातील जिंदाल फोटो फिल्म्स कंपनीची आग मोठ्या प्रमाणावर पसरल्याने कंपनीपासून तीन किलोमीटर अंतरापर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे या तीन किलोमीटर परिसरात ज्वलनशील पदार्थ, दगड, काठ्या किंवा अन्य शस्त्रे घेऊन फिरण्यास मनाई करण्यात आली आहे.
आगीची तीव्रता वाढल्याने कंपनीच्या सर्व बाजूंनी आगीची धग जाणवत आहे व आग आजूबाजूला पसरत आहे, तसेच कंपनीत रासायनिक साहित्य व गॅस टाक्यांना आगीमुळे धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कंपनीच्या सर्व बाजूंनी तीन किलोमीटर अंतरापर्यंत कोणीही जाऊ नये, तसेच जनावरांनादेखील जाऊ देऊ नये, असे आवाहन इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी ओम्कार पवार यांनी केले आहे.
मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1), तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 34 अन्वये वरीलप्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश काढण्यात आला असून, या तीन किलोमीटर परिसरात कोणीही जाऊ नये, जनावरांनाही जाऊ देऊ नये, तसेच उत्तेजक भाषणे, मिरवणुका काढणे किंवा कोणतेही सांस्कृतिक, धार्मिक व राजकीय कार्यक्रम करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
आग आटोक्यात येऊन आपत्तीनिवारण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हा आदेश लागू राहील, असे सहाय्यक जिल्हाधिकारी ओम्कार पवार यांनी एका पत्रकान्वये स्पष्ट केले आहे.