Igatpuri News : जिंदाल कंपनीला भीषण आग (Video)
Igatpuri News : जिंदाल कंपनीला भीषण आग (Video)
img
दैनिक भ्रमर

इगतपुरी (भास्कर सोनवणे) :- तालुक्यातील मुंडेगाव शिवारामध्ये असलेल्या जिंदाल कंपनीला मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या अग्नितांडवामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कंपनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. 


याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की,  मुंबई-नाशिक महामार्गावरील मुंडेगाव शिवारात असलेल्या जिंदाल कंपनीच्या परिसरात काल मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. प्राथमिक माहितीनुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे समजते. या अग्नितांडवामुळे परिसरामध्ये चांगलीच खळबळ उडाली. आजूबाजूच्या गावातील नागरिक या ठिकाणी दाखल झाले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर इगतपुरीचे तहसीलदार, इगतपुरी व वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी या ठिकाणी दाखल झाले.

कंपनीच्या चार नंबर गेटच्या मागील शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर रॉ मटेरियल साठवलेले होते. याच भागातून आगीची सुरुवात झाली. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले. आगीमुळे आकाशात धुराचे लोट पसरले होते, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच इगतपुरी नगरपरिषद, महिंद्रा अँड महिंद्रा आणि नाशिक महापालिकेच्या सिडको, मुख्यालय आणि पंचवटी विभागीय कार्यालय येथून अग्निशमन दलाच्या 6 ते 7 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले. या ठिकाणी अग्निशमन दलाचे बंब कायम ठेवण्यात आलेले आहेत. 

आग लागल्यामुळे कंपनीच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीच्या नेमक्या कारणाचा तपास सुरू असून सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी तळ ठोकून आहेत. 4 तासांच्या प्रयत्नांनंतरही ही आग धुमसत आहे. 

व्हिडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा 


इतर बातम्या
Join Whatsapp Group