
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- लक्ष्मी पूजनानिमित्त शहर परिसरात काल रात्री फटाक्यांची आतषबाजी ठिकठिकाणी सुरू होती. यात 6 ठिकाणी फटाक्यांमुळे आगीच्या घटना घडल्या. सुदैवाने कोणत्याच घटनेत जिवीतहानी झाली नाही.
आगीची पहिली घटना पाथर्डी फाटा परिसरात घडली. पाथर्डी फाट्यावरील धामणे गार्डनजवळ शांतीकृपा अपार्टमेंट आहे. या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील फ्लॅटच्या बाल्कनीला फटाक्यांमुळे आग लागली. या आगीच बाल्कनीतील प्लास्टिकचे साहित्य जळून खाक झाले.
आगीच्या दुसर्या घ्टनेत कन्नमवार पुलाजवळील गवताला फटाक्यांमुळे आग लागली. आगीच्या तिसर्या घटनेत देवळाली गावात लिंगायत कॉलनीमध्ये एका नारळाच्या झाडाला आग लागली. आगीची चौथी घटना तपोवन रोड परिसरात घडली. उत्तरानगरमधील पोद्दार हायस्कूलसमोर कमल अपार्टमेंट नावाची इमारत आहे. या इमारतीमध्ये पाचव्या मजल्यावरील घराच्या बाल्कनीला फटाक्यांमुळे आग लागली. आगीमध्ये गॅलरीतील किरकोळ सामानाचे नुकसान झाले.
आगीच्या पाचव्या घटनेत नामको हॉस्पिटलच्या मागे असलेल्या अथर्व पार्क सोसायटीमध्ये इलेक्ट्रिक केबल जळाली. आगीची सहावी घटना भद्रकालीत घडली. भद्रकाली टॅक्सी स्टॅण्डसमोर ललित भोई यांच्या मालकीचे मोबाईल विक्री व दुरुस्तीचे दुकान आहे. फटाक्यांमुळे या दुकानाला काल रात्री 11 वाजेच्या सुमारास आग लागली.
आगीमुळे दुकानातील मोबाईल, मोबाईल अॅक्सेसरीज जळून खाक झाल्याने भोई यांचे आर्थिक नुकसान झाले. सर्व आगी किरकोळ व मध्यम स्वरुपाच्या असल्याने प्रत्येक ठिकाणी एका बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आली.