नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- कच्च्या चांदीची ऑर्डर देऊन त्या बदल्यात तेरा लाख रुपये घेऊनही कच्ची चांदी न पाठविता व्यापार्याची आर्थिक फसवणूक करणार्या पुण्याच्या तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी प्रकाश बच्चूभाई तांबट (रा. देवधर लेन, रविवार पेठ, नाशिक) हे चांदीचे व्यापारी आहेत. त्यांनी बी बी कॉर्पोरेशन या चांदीच्या दुकानासाठी चार किलो कच्च्या चांदीची ऑर्डर पुणे येथील नवकार ज्वेलर्सचे प्रोप्रायटरी मालक नेमिचंद कोरीमुथ्था, प्रणव कोरीमुथ्था व अमन कोरीमुथ्था (तिघेही रा. धनवर्षा मार्केट, रविवार पेठ, पुणे) यांना दिली व त्यासाठी फिर्यादी तांबट यांनी कोरीमुथ्था यांना वेळोवेळी 13 लाख 4 हजार रुपये आरटीजीएसद्वारे ऑनलाईन पद्धतीने दिले,
मात्र या तीनही आरोपींनी संगनमत करून फिर्यादीकडून ऑनलाईन पैसे स्वीकारूनही कच्ची चांदी न पाठविता 13 लाख 4 हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार दि. 23 जानेवारी ते 4 फेब्रुवारी 2026 या कालावधीत घडला. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डगळे करीत आहेत.