नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून शेअर्स ब्रोकरने 2 कोटी 16 लाख 4 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी व साक्षीदार हे नाशिक परिसरात राहतात. आरोपी अज्ञात व्यक्तींनी विविध व्हॉट्सअॅप क्रमांकांवरून फिर्यादी व साक्षीदारांशी चॅटिंगद्वारे संपर्क साधला. इंटरनेटच्या माध्यमातून शेअर मार्केट ब्रोकर बोलत असल्याचे भासविण्यात आले. ऑनलाईन शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले.
फिर्यादी व साक्षीदारांचा विश्वास संपादन करून त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यांवर दि. 15 नोव्हेंबर 2025 ते 16 जानेवारी 2026 यादरम्यान वेगवेगळ्या बँक खात्यांवर 2 कोटी 16 लाख 4 हजार 750 रुपये मोबाईल फोन व इंटरनेटद्वारे ट्रान्स्फर करण्यास भाग पाडले; मात्र गुंतवणूक केलेली रक्कम व जादा परतावा न देता फसवणूक केली. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, याबाबतचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पिसे करीत आहेत.