नाशिक (चंद्रशेखर गोसावी) :- शहरातील तिगरानिया चौकात असलेल्या भंगार गोदामाला आज सकाळी भीषण आग लागली. या आगीत गोदाम जळून खाक झाले असून, अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीच्या प्रयत्नांनी एक तासात आग आटोक्यात आणली. आगीमुळे या परिसरामध्ये काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले होते.
याबाबत उपलब्ध झालेली अधिक माहिती अशी, की द्वारका परिसरात असलेल्या टाकळी रोडवरील तिगरानिया चौकात एक मोठे भंगाराचे गोदाम आहे. या ठिकाणी भंगाराचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असतो. आज पहाटे सहा वाजेच्या सुमारास अचानक या भंगार गोदामाला आग लागली. सुरुवातीला गोदामामधून धूर येत होता. त्यानंतर हळूहळू आग पसरून आगीचे लोळ वाढू लागले. या परिसरात सकाळी पहाटे फिरण्यासाठी जाणार्या नागरिकांपैकी एकाने याची माहिती अग्निशमन दलाला फोन करून दिली. त्यानंतर तातडीने महानगरपालिकेच्या अग्निशमन मुख्यालयातील आगीचे बंब या ठिकाणी पाठविण्यात आले. त्यानंतर पंचवटी, सिडको, सातपूर अग्निशमन दलाचे बंब या ठिकाणी बोलाविण्यात आले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी सातत्याने एकूण आठ बंबांच्या सहाय्याने एक तासांमध्ये ही आग आटोक्यात आणली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने भद्रकाली पोलीस व उपनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारीदेखील या ठिकाणी दाखल झाले. अग्निशमन दलाचे कर्मचारी शिर्के, एस. आर. थोरात, पटेल, महेश कदम, शरद बेटके, मंगेश जाधव, प्रदीप वाघ व स्वप्नील नांद्रे यांच्यासह इतर कर्मचारी आणि अधिकार्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. ही आग नक्की कशामुळे लागली; हे मात्र समजू शकले नाही.