सोशल मीडियावर झालेली ओळख, त्यानंतर फुललेलं प्रेम आणि कुटुंबीयांच्या संमतीने झालेला प्रेमविवाह… मात्र, अवघ्या नऊ महिन्यांतच या संसाराचा भयंकर शेवट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटस्फोट देण्याच्या मुद्द्यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाल्याची माहिती असून, घटस्फोटास नकार दिल्याने पतीने पत्नीला जिवंत जाळल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नेमकी ही घटना कुठे घडली? या प्रकरणामागे काय कारण होतं आणि पोलिसांच्या तपासात काय समोर आलं? जाणून घेऊया सविस्तर.
बिहारच्या सुपौल जिल्ह्यात प्रेमविवाहानंतर हत्येची ही हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. पत्नी घटस्फोटासाठी तयार होत नसल्याच्या रागातून पतीने तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळल्याचा गंभीर आरोप आहे. या घटनेत गंभीर भाजलेल्या पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी पती संजीव साहला अटक केली असून, त्याच्या वडिलांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
बिहारच्या सुपौल जिल्ह्यात प्रेमविवाहानंतर हत्येची एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. पत्नी घटस्फोटासाठी तयार होत नसल्याच्या रागातून पतीने तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळल्याचा गंभीर आरोप आहे. या घटनेत गंभीर भाजलेल्या पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी पती संजीव साहला अटक केली असून, त्याच्या वडिलांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
सुपौल जिल्ह्यातील रतनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सातनपट्टी पंचायतीमधील लालमनपट्टी येथील सुपौल उपशाखा कालव्याजवळ ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संजीव साहने नऊ महिन्यांपूर्वी मुझफ्फरपूर जिल्ह्यातील करजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या दामिनी कुमारीशी प्रेमविवाह केला होता. दोघांची ओळख दोन वर्षांपूर्वी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून झाली होती. सोशल मीडियावर सुरू झालेला संवाद हळूहळू प्रेमात बदलला आणि त्यानंतर दोघांनी कोर्ट मॅरेज केलं.
वीरपूरचे एसडीपीओ पवन कुमार यांनी सांगितलं की, लग्नानंतर दोघांमध्ये काही मुद्यांवरून वाद होऊ लागले होते. संजीव साहला घटस्फोट हवा होता, मात्र दामिनी त्यासाठी तयार नव्हती. आरोपीच्या म्हणण्यानुसार, त्याने मुझफ्फरपूरमध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला होता, मात्र दामिनी कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यास तयार नव्हती. याच कारणातून त्याने पत्नीच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. लग्नानंतर दामिनी एकदा त्याच्या घरी आली होती, मात्र एका दिवसानंतर ती परत निघून गेली होती, असं संजीवने पोलिसांना सांगितले. तो स्वतःसुद्धा कधीकधी सासरच्या घरी जात असे. दोघांमधील वाद वाढल्यानंतर प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले होते. संजीवने दामिनीच्या अंगावर पेट्रोल ओतलं आणि तिला पेटवून दिलं. यानंतर तो तिथून पसार झाला.
या भीषण घटनेत दामिनी गंभीरपणे भाजली होती. तिला उपचारासाठी सुपौल येथील सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे रविवारी सकाळी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. घटनास्थळावरून पेट्रोलसारख्या पदार्थाचे पुरावे हाती लागले आहेत. पोलिसांनी मुख्य आरोपी संजीव साहला अटक केली असून त्याचे वडील कीनू साह यांनाही ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केलं आहे. पोलीस कुटुंबाच्या तक्रारीवरून कायदेशीर कारवाई करत असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.