महाराष्ट्राच्या राजकारणात आज पुन्हा एकदा प्रतिष्ठेची लढाई रंगणार आहे. विधान परिषदेच्या पाच जागांसाठी आज मतदान होत असून, महायुती आणि महाविकास आघाडीने विजयासाठी कंबर कसली आहे. काही मतदारसंघांतील बंडखोरी, मित्रपक्षांमधील मतभेद आणि अपक्ष उमेदवारांमुळे निवडणुकीची रंगत वाढली आहे. त्यामुळे या पाच जागांवर कोण बाजी मारणार आणि मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने जाणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदान होणार आहे. पुणे, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर या ३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडेल. या निवडणुकीमध्ये ५ जागांसाठी १८२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या सर्व उमेदवारांचे भवितव्य १० लाख मतदारांच्या हातामध्ये आहे. या निवडणुकीसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. या निवडणुकीत कोण विधानपरिषदेवर आमदार होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि नागपूर या पदवीधर मतदारसंघासाठी आणि अमरावती आणि पुणे या दोन मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. सकाळी ८ वाजता मतदानाला सुरूवात होईल. तर दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान पार पडेल. पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांसाठी पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या ५ ठिकाणी मतदान पार पडत आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, अकोला आणि वाशिम या ५ जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे. तर नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या ६ जिल्ह्यात मतदान होणार आहे. तर छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघासाठी ८ जिल्ह्यात मतदान होणार आहे.
शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी अनेक ठिकाणी बंडखोरांनी आणि अपक्षांनी मोठे आव्हान उभे केले आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी ६ जिल्ह्यांमध्ये ४४५ मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत. तर २२,५५,६०३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पुणे पदवधीर आणि शिक्षक मतदारसंघासाठी २३२ मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. याठिकाणी १,०५,०८४ मतदार मतदान करणार आहेत. संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मराठवाड्यामध्ये ३ लाख २६ हजार ७०० मतदार मतदान करणार आहे. यासाठी ८ जिल्ह्यात ८४२ मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत. अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी तब्बल ८१ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. अमरावतीमध्ये ३५,८१० शिक्षक मतदार आपला मतदानाचा हक्क बाजवणार आहे.
शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतदानासाठी ११ प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १० पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले असून त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येणार आहे. आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, केंद्र अथवा राज्य शासन, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा इतर खासगी औद्योगिक संस्थांद्वारे त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिलेले सेवा ओळखपत्र, खासदार, आमदार किंवा विधान परिषद सदस्य यांना दिलेली अधिकृत ओळखपत्रे, संबंधित शिक्षक/पदवीधर मतदार संघातील मतदार ज्या शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरत आहेत, त्या शैक्षणिक संस्थांनी जारी केलेले सेवा ओळखपत्र, विद्यापीठाद्वारे वितरीत मूळ पदवी/पदविका प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले शारीरिक दिव्यांगात्वाचे मूळ प्रमाणपत्र, युनिक डिसॅबिलिटी ओळखपत्र हे पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.