एअर इंडियाच्या विमानात हायजॅक अलर्ट मिळाल्याने विमान वाहतूक आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली. फ्रँकफर्टहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे खबरदारीचा उपाय म्हणून जयपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. या विमानात ३०६ प्रवासी असल्याचे वृत्त आहे. विमान सुरक्षित उतरवल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी तपासणी सुरू केली. मात्र, विमानात नेमका हायजॅकचा धोका होता की तांत्रिक किंवा अन्य कारणामुळे अलर्ट जारी झाला, याबाबत अधिकृत स्पष्टता येणे बाकी आहे. या घटनेमुळे विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
एअर इंडियाच्या AI-2030 या विमानाचे जयपूर विमानतळावर सुरक्षित इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. हे विमान जर्मनीतील फ्रँकफर्ट येथून दिल्लीच्या दिशेने जात होते. विमानासंदर्भात अहमदाबाद एअर ट्रॅफिक कंट्रोलला (ATC) अलर्ट मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा तातडीने सतर्क झाल्या.
पायलटने इमर्जन्सी कोड पाठवला मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विमानाच्या पायलटकडून चुकून आपत्कालीन परिस्थिती दर्शवणारा कोड पाठवण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. विमानाच्या पायलटने काही सेकंदांसाठी स्क्वॉक-7500 हा कोड पाठवल्याचे सांगितले जात आहे. 7500 हा कोड विमानात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती किंवा विमान हायजॅक झाल्यावर पाठवला जातो. हा अलर्ट मिळताच संबंधित यंत्रणांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. खबरदारीचा उपाय म्हणून विमान दिल्लीऐवजी जयपूरच्या दिशेने वळवण्यात आले आणि तेथे सुरक्षित लँडिंग करण्यात आले. मात्र, हा कोड नेमका कोणत्या कारणामुळे पाठवण्यात आला, याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नाही.
सर्व प्रवासी सुखरूप सकाळी सुमारे ९ वाजून ४५ मिनिटांनी विमान जयपूर विमानतळावरील आयसोलेशन वेवर नेण्यात आले. सुरक्षेच्या दृष्टीने विमानाला इतर विमानांपासून वेगळे ठेवण्यात आले. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांच्या देखरेखीखाली सर्व प्रवाशांना विमानातून खाली उतरवण्यात आले. प्रवाशांना विमानतळाच्या टर्मिनलमध्ये बसवण्यात आले असून, संबंधित यंत्रणांकडून तपासणी केली जात आहे.विमानतळावर अशा प्रकारचा अलर्ट मिळाल्यानंतर संभाव्य धोका टाळण्यासाठी सुरक्षा यंत्रणा विशेष खबरदारी घेतात. या घटनेमुळे जयपूर विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेत काही काळ सतर्कता वाढवण्यात आली. तपासानंतरच या अलर्टमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
दुबई-तेल अवीव विमानात नेमकं काय घडलं होत? ३० सप्टेंबर रोजी दुबईहून इस्रायलमधील तेल अवीवला जाणाऱ्या फ्लायदुबईच्या FZ1073 विमानात हायजॅक अलर्ट जारी करण्यात आला. बोईंग ७३७ मॅक्स विमानाने प्रथम इमर्जन्सी कोड ७७०० आणि त्यानंतर हायजॅकचा ७५०० कोड यंत्रणांना पाठवण्यात आला. यानंतर विमानाचा मार्ग बदलून सौदी अरेबियातील तबुक विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. या घटनेत को पायलटने पायलटवर हल्ला केला आणि विमान तेल अवीव विमानतळाच्या टर्मिनलला धडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. विमानाची उंची झपाट्याने कमी झाल्यानंतर इतर वैमानिक आणि प्रवाशांनी मध्यस्थी केल्याचे सांगितले जाते. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.