अलीकडे अपघातांच्या प्रमाणात चिंताजनक वाढ ढ होत चालली आहे. दरम्यान आता अशाच एका भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशचे सहारनपूर जिल्ह्यातील देवबंद येथे भीषण अपघात झाला. शाकंभरी देवीचे दर्शन घेऊन मातेची ज्योत घेऊन पदयात्रेने परतणाऱ्या भाविकांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला भरधाव ट्रकने मागून जोरदार धडक दिली. शनिवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास महामार्गावरील उड्डाणपुलावर हा अपघात झाला. या दुर्घटनेत चार भविकांचा मृत्यू झाला असून 15 हून अधिक जण जखमी झाले आहेत.
मृत भाविक हे मेरठ जिल्ह्यातील सरधना परिसरातील कुशावली गावचे रहिवासी होते. या घटनेनंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य करत जखमीना रुग्णालयात दाखल केले. मिळालेल्या महितीनुसार, कुशावली गावातील 19 लोक 7 ऑक्टोबरला ट्रॅक्टर ट्रॉलीने शाकंभरी देवीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शनानंतर शनिवारी सकाळी सर्वजण मातेची ज्योत घेऊन पदयात्रेने गावाकडे परतत होते. याच दरम्यान देवबंद येथील महामार्गावरील उड्डाणपुलावर पाठीमागून आलेल्या भांडी भरलेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या ट्रॅक्टरला धडक दिली.
या भीषण अपघातात रमेश (वय 40), सागर (वय 34), अमन (वय 23) आणि सतेंद्र यांचा मृत्यू झाला. अपघातात 15 हून अधिक भाविक जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्वतःच्या वाहनांसह दुचाकी आणि रुग्णवाहिकांच्या जखमीना सरकारी रुग्णालयात पोहोचवले. प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमीना पुढील उपचारांसाठी सहारनपूर आणि मेरठ येथील रुग्णालयात हलवण्यात आले. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
या अपघातात एकूण चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास सुरू आहे.