राजकीय घडामोडींना वेग आला असून आता भाजपच्या गोटातून एक मोठी बातमी सामोर आली आहे. उत्तर प्रदेशातील राज्यसभेच्या १० जागांसाठीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. भारतीय जनता पक्षाने (भाजप) ८ जागांवर, तर समाजवादी पक्षाने (सपा) २ जागांवर विजय मिळवला आहे. तसेच अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर सर्व १० उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. या निवडणुकीसाठी भाजपच्या आठ आणि समाजवादी पक्षाच्या दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. याशिवाय दोन अपक्ष उमेदवारांनीही अर्ज भरले होते. मात्र, छाननीदरम्यान त्यांचे अपूर्ण अर्ज बाद करण्यात आले. त्यामुळे निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आणि भाजपचे आठ, तर समाजवादी पक्षाचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले.
भाजपचे आठ उमेदवार राज्यसभेवर भाजपकडून धर्मपाल सिंह, राधाकांत ओझा, प्रकाश पाल, विद्यासागर सोनकर, गोपी कृष्ण पांडेय, प्रियंका सिंह रावत, राम प्रताप सिंह चौहान आणि श्रुती गंगवार यांची राज्यसभेवर निवड झाली आहे. धर्मपाल सिंह हे योगी सरकारमधील मंत्री असून आंवला मतदारसंघातून आमदार राहिले आहेत. राधाकांत ओझा हे वरिष्ठ वकील आहे. प्रकाश पाल यांनी भाजपच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केले आहे. विद्यासागर सोनकर हे भाजपचे अनुभवी नेते असून पूर्वांचलमधील दलित चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. गोपी कृष्ण पांडेय हे पक्षाच्या संघटनात्मक कामात सक्रिय आहेत. प्रियंका सिंह रावत या बाराबंकीच्या माजी खासदार असून दलित महिला नेत्या म्हणून परिचित आहेत. राम प्रताप सिंह चौहान यांनी भाजपचे प्रदेश महामंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. श्रुती गंगवार या भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांच्या कन्या आहेत.
समाजवादी पक्षाचे दोन उमेदवार विजयी समाजवादी पक्षाकडून ज्येष्ठ नेते प्रा. रामगोपाल यादव आणि धनराज परिमल नथवानी यांची राज्यसभेवर निवड झाली आहे. रामगोपाल यादव हे अखिलेश यादव यांचे काका आहेत. पक्षाच्या संघटनात्मक आणि राजकीय निर्णयांमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. धनराज परिमल नथवानी यांचा उद्योग क्षेत्राशी संबंध असून त्यांच्या उमेदवारीवरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती.