सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. देशातील आघाडीची दूध उत्पादक कंपनी अमूलने दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून म्हणजेच १२ नोव्हेंबरपासून दुधाचे नवे दर लागू झाले आहेत. अमूल गोल्ड, ताजा यांसह विविध प्रकारच्या दुधाच्या किमतीत वाढ झाल्याने ग्राहकांचे बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. नेमकं कोणतं दूध किती रुपयांनी महागलं? अमूलच्या दुधाचे नवीन दर काय आहेत? जाणून घ्या सविस्तर...
देशातील आघाडीची दूध उत्पादक कंपनी अमूलने आपल्या विविध प्रकारच्या दुधाच्या दरात प्रति लिटर दोन ते चार रुपयांपर्यंत वाढ केली आहे. हे नवीन दर आजपासूनच देशभरात लागू झाले आहेत. या दरवाढीमुळे आधीच महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना आणखी एक आर्थिक झटका बसला आहे. कंपनीने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, पशुखाद्य आणि पॅकेजिंग साहित्याचा खर्च वाढल्याने हा दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.
दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा यासाठीच दूध दर वाढवल्याचे अमूलने म्हटले आहे. अमूल गोल्ड चार रुपयांनी तर अमूल ताजा प्रति लिटर दोन रुपयांनी महागणार आहे. दुधाच्या प्रकारानुसार दरवाढ वेगवेगळी असणार आहे. या दरवाढीचा थेट परिणाम रोजच्या घरगुती बजेटवर होणार आहे. विशेषतः दररोज चहा, कॉफी, लहान मुलांसाठी आणि इतर गरजांसाठी अमूलचं दूध खरेदी करणाऱ्या कुटुंबांना आता अधिक पैसे मोजावे लागतील. याआधी मदर डेअरीनेही दुधाच्या दरात वाढ केली होती, त्यामुळे दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे.