संतापाच्या भरात माणूस किती क्रूर होऊ शकतो, याचा प्रत्यय कल्याणमधील एका धक्कादायक घटनेतून आला आहे. पैशांच्या वादातून एका पतीने आपल्याच पत्नीवर आणि अवघ्या पाच वर्षांच्या चिमुकल्या मुलावर उकळते मटण फेकल्याची संतापजनक घटना घडली आहे. पोटच्या लेकरावरही दया न दाखवणाऱ्या या कृत्यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
पैशांच्या वादातून पतीने स्वतःच्या पत्नीवर आणि पाच वर्षांच्या निष्पाप मुलावर उकळते मटण फेकून गंभीररीत्या भाजल्याची अत्यंत संतापजनक घटना कल्याण पश्चिमेतील वालधुनी परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात आरोपी पतीत विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वालधुनी परिसरात राहणारा आरोपी अमिर खान याने आपली पत्नी गुलशन हिच्याकडे पैशांची मागणी केली होती. मात्र, गुलशनने पैसे देण्यास असमर्थता दर्शवत नकार दिला. यावरून दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. वादाच्या भरात संतापलेल्या अमिरने पत्नीला बेदम मारहाण करत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता त्याने घरातील अवघ्या पाच वर्षांच्या चिमुकल्याला सदऱ्याची गळपट्टी पकडून बाथरूमच्या दिशेने फरफटत नेले.
आपल्या चिमुकल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी गुलशन तत्काळ धावून गेली. मुलाला सोडवण्याच्या प्रयत्नात पती-पत्नीमध्ये जोरदार झटापट झाली. त्याच वेळी स्वयंपाकघरात गॅसवर मटण शिजत होते. क्रूरतेची हद्द ओलांडत अमिरने गॅसवरील उकळत्या मटणाचे पातेले उचलून थेट पत्नीच्या अंगावर फेकले. या उकळत्या मटणामुळे आणि गरम पाण्यामुळे गुलशनचे हात-पाय गंभीररीत्या भाजले. तसेच, जवळच उभा असलेला पाच वर्षांचा मुलगाही या गरम पाण्यामुळे भाजला गेला.
घटनेनंतर गंभीर भाजलेल्या अवस्थेत माय-लेकाला तातडीने केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार घेतल्यानंतर, गुलशनने हिंमत दाखवून थेट महात्मा फुले पोलीस ठाणे गाठले आणि पती अमिर खानविरोधात तक्रार नोंदवली.
पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अमिर खानविरोधात गुन्हा दाखल केला असून या घृणास्पद घटनेचा पुढील कायदेशीर तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे कल्याण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.