महाराष्ट्राच्या राजकारणात ५०० कोटी रुपयांच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे मोठी खळबळ उडाली आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याशी संबंधित या प्रकरणाची आता फॉरेन्सिक तपासणी केली जाणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे. या कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाची सत्यता पडताळणे, आवाजांची ओळख निश्चित करणे आणि क्लिपमध्ये काही फेरफार झाला आहे का, हे तपासातून स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. नेमकी ही ऑडिओ क्लिप काय आहे, त्यावरून वाद का निर्माण झाला आणि फॉरेन्सिक तपासणीतून काय स्पष्ट होऊ शकते? जाणून घेऊया सविस्तर
या क्लिपमध्ये ५०० कोटी रुपयांच्या कथित व्यवहाराचा उल्लेख असल्याचा दावा केला जात आहे. मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्या नावाने भाजपकडून ५०० कोटी रुपये घेतल्याचा खळबळजनक दावा केला होता. त्यांनी पत्रकार परिषद घेत ही ऑडिओ क्लिप सर्वांना ऐकवून दाखवली होती. आता या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. या ऑडिओ क्लिपची संपूर्ण फॉरेन्सिक तपासणी केली जाईल, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपबद्दल सांगितले की, 'अडीच वर्षांनंतर ऑडिओ क्लिप बाहेर आली आहे. यामागचे षडयंत्र काय? हे तपासले जाणार आहे. या ऑडिओ क्लिपचा पूर्णपणे तपास होईल. आम्हाला सर्वांना प्रश्न पडला आहे की अडीच वर्षांनंतर ही ऑडिओ क्लिप बाहेर येण्यामागचा हेतू काय आहे? कुणाला टार्गेट केले जात आहे? कशासाठी केले जात आहे? या संदर्भात पूर्ण चौकशी करून सत्य आम्ही बाहेर काढू.'
५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपची तपासणी एसआयटी करणार आहे. यावरून संजय राऊत यांनी प्रकिक्रिया देत सरकारवर सडकून टीका केली. फडणवीसांनी एसआयटीचा खेळ चालवला आहे. एसआयटी काय असते? तुमचाच ढोल आणि तुमच्याच दांडिया. आतापर्यंत फडणवीसांनी ११२ एसआयटी स्थापन केल्या. आल्यापासून ते फक्त एसआयटी स्थापन करत आहेत. फडणवीसांकडून एसआयटीचा खेळ चालला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप, शिंदेगट आणि अजित पवार गटाकडून पैशाचा खेळ कसा चालला आहे याचा स्फोट मनोज जरांगे पाटील यांनी केला.'