पोलीस विभागातील लाचखोरीचा आणखी एक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याला तब्बल ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या या कारवाईमुळे पोलीस दलात चर्चांना उधाण आले आहे.
समोर आलेल्या ,माहितीनुसार , वाळू वाहतुकीला कोणताही अडथळा न आणता ती सुरू ठेवण्यासाठी दरमहा 40 हजार रुपयांची मागणी करणाऱ्या पोलिस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. नाशिक येथील एसीबीच्या पथकाने कोपरगाव तालुक्यातील देर्डे फाटा येथे सापळा रचून ही कारवाई केली. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक शिंदे असे कारवाई करण्यात आलेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. तो शिर्डी पोलिस ठाण्यात कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. वाळूची वाहतूक नियमितपणे सुरू ठेवण्यासाठी संबंधित व्यक्तीकडे दर महिन्याला 40 हजार रुपये देण्याची मागणी करण्यात आली होती.
या लाचेच्या मागणीबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर नाशिक एसीबीच्या पथकाने सापळा लावण्याची तयारी केली. त्यानुसार कोपरगाव तालुक्यातील देर्डे फाटा परिसरात सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे 40 हजार रुपयांची रक्कम स्वीकारत असताना एसीबीच्या पथकाने हवालदार अशोक शिंदे याला रंगेहात पकडले.
मात्र, पथकाच्या कारवाईची चाहूल लागताच त्याने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवत त्याला ताब्यात घेतले. या संपूर्ण कारवाईचा व्हिडिओही आता समोर आला असून, त्याची परिसरात चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, या प्रकरणात एसीबीकडून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे. शासकीय कामासाठी लाचेची मागणी करणाऱ्यांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.