महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत मिळत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पुन्हा फूट पडणार असल्याचा दावा शिंदे गटातील एका आमदाराने केला आहे. या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून, ठाकरे गटात नेमकं काय घडणार, याबाबत तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे. कोणत्या आमदाराने केला हा दावा? ठाकरे सेनेला पुन्हा खिंडार पडणार का? जाणून घेऊया सविस्तर...
समोर आलेल्या माहितीनुसार, शिंदेसेनेचे नेते संजय गायकवाड यांनी ऑपरेशन टायगरबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. येत्या काळात ऑपरेशन टायगर कधीही होऊ शकते, असे संकेत त्यांनी दिले आहेत. त्यामुळे ठाकरे गटातील काही नेते शिंदेसेनेत प्रवेश करणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. संजय गायकवाड यांनी सांगितले की, शिवसेना पक्षाचा विस्तार करणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
महाराष्ट्रासह संपूर्ण देशात शिवसेनेची ताकद वाढली पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने काम करत आहेत. पक्ष मोठा करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आगामी काळात शिवसेनेची ताकद आणखी वाढलेली दिसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच ऑपरेशन टायगर ही प्रक्रिया थांबणारी नसून भविष्यातही पक्षवाढीसाठी प्रयत्न सुरूच राहणार असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यामुळे ठाकरे गटाला पुन्हा धक्का बसणार का, याबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे. ठाकरे गटातील काही नेते शिंदेसेनेच्या संपर्कात आहेत का आणि आगामी काळात कोणते राजकीय बदल घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.