राजकारणात सध्या नाराजी नाट्य आणि पक्षांतराचे सत्र हे सुरूच असून आता एक मोठी बातमी समोर आली आहे. मनसेला मोठा धक्का बसला आहे. रणजित शिरोळे यांनी मनसेची साथ सोडली आहे. त्यांनी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. हा पुण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. मनसेचे राज्य सरचिटणीस म्हणून देखील रणजित शिरोळे यांनी पक्षाचं काम केलं होतं. मात्र त्यानंतर आता त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. रणजित शिरोळे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
दरम्यान शिरोळे कुटुंबाचे अनेक वर्षाचे काँग्रेससोबत ऋणानुबंध आहेत. त्यासोबत आम आदमी पक्षाचे सहकारीही काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. ज्या नेत्यांना व्हिजन आहे, अजेंडा आहे ते आगामी काळात पक्षात प्रवेश करतील असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला.
टिळक भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, रणजित शिरोळे यांचे पक्षात स्वागत करतो. त्यांच्या कुटुंबाचे आणि काँग्रेसचे ऋणानुबंध फार जुने आहेत. काँग्रेस विचारांचा आणि संस्कृतीचा वारसा शिरोळे यांना लाभलाय. पुण्यातील मूळ शहरात ज्यांच्या सात पिढ्या राहिल्या आहेत. पुण्याच्या जडणघडणीत त्यांच्या कुटुंबाचे योगदान होते. त्यांचे वडील काँग्रेसमधूनच नगसेवक होत स्थायी समिती अध्यक्ष झाले होते, असं सपकाळ म्हणालेत.
रणजित शिरोळे हे मनसेच्या स्थापनेपासून पक्षात होते. त्यांच्यावर प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी होती. त्यांनी २००९ साली मनसेकडून लोकसभेची निवडणूकही लढवली होती. त्यांचे वडील श्रीकांत शिरोळे यांनी पुण्यात अनेक वर्ष स्थायी समिती अध्यक्ष म्हणून काम केले होते. त्यांचे आजोबा भाऊसाहेब शिरोळे हे पुण्यातील काँग्रेसचे नेते होते. पुण्यात ते बिनविरोध महापौर झाले होते. त्यांनी आमदार म्हणून विधानसभेत काम केले होते. मात्र रणजित शिरोळे हे राज ठाकरेंच्या जवळचे होते. मनसेच्या स्थापनेपासून ते पक्षात सक्रीय होते. परंतु २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रणजित शिरोळे यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता