गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय पक्षांमध्ये पक्षांतराचे सत्र सुरु असून आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. पक्षातील तीन नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केल्याने मोहाडीच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. गोंदिया येथे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. गोंदिया येथे आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमात खासदार प्रफुल्ल पटेल यांनी नव्याने पक्षात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले.
यावेळी त्यांनी संघटनात्मक एकजुटीचे महत्त्व अधोरेखित करत सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र काम करण्याचे आवाहन केले. पक्षात प्रवेश केल्यानंतर प्रत्येकाने आपापसातील मतभेद बाजूला ठेवून संघटना मजबूत करण्यासाठी योगदान द्यावे, असा संदेश त्यांनी दिला.