नाशिकच्या
नाशिकच्या "या" लोकप्रिय मिसळ पॉइंटवर FDA ची कारवाई
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- अन्न व औषध प्रशासनाची नामांकित हॉटेल्समधील अन्न तपासणी मोहीम सुरूच असून, शुक्रवारी एकाच दिवसात या प्रशासनाने केलेल्या कारवाईत सातपूर एमआयडीसीतील ‘श्यामसुंदर’ मिसळसह चार हॉटेल्सचे अन्न परवाने निलंबित करण्यात आले आहेत, तर एका आस्थापनेचे नोंदणी प्रमाणपत्रच निलंबित करण्यात आले आहे.

एफडीएच्या कारवाईत जुना गंगापूर नाका, वूडलॅण्ड टॉवरमधील हॉटेल विहार, सातपूर एमआयडीसीतील हॉटेल श्यामसुंदर, कॉलेज रोडवरील मलेरिया स्टॉपजवळील हॉटेल तुषार मिसळ आणि आडगाव फाटा, पंचवटी, येथील हॉटेल महाराजा काठियावाडी या हॉटेलचे अन्न परवाने निलंबित करण्यात आले आहेत, तर कृषीनगर, कॉलेज रोड येथील मे. कॅफे दुर्गा कॅफे यांचे अन्न नोंदणी प्रमाणपत्र तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.
अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार हॉटेल विहारमध्ये अस्वच्छ परिस्थिती आढळून आली. अन्न तयार करण्याच्या ठिकाणी कीटक व इतर उपद्रवी जिवांचा प्रादुर्भाव आढळून आला.

हॉटेल श्यामसुंदरमध्ये अनुसूची-4 मधील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले, तसेच कच्चा माल अस्वच्छ परिस्थितीत साठविलेला आढळून आला, तसेच स्वयंपाकघराच्या रचना व बांधकामविषयक अटींचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले. दुर्गा कॅफेमध्येदेखील अनुसूची-4 मधील तरतुदींचे उल्लंघन, हॉटेलमधील अस्वच्छ परिस्थिती आणि ग्राहकांना दिलेल्या बिलांवर एफएसएसएआयचा परवाना क्रमांक नमूद केलेला नव्हता. आस्थापनेच्या मेनू कार्डावर स्वयंपाकासाठी वापरण्यात येणार्‍या माध्यमांचा उल्लेख नव्हता. हॉटेल तुषारमध्ये अन्न आस्थापनेमध्ये अस्वच्छ परिस्थिती, अन्न साठवणुकीसाठी अपुरी जागा आणि मुदतबाह्य अन्नपदार्थ साठविलेले आढळले.

तसेच आडगाव फाटा, पंचवटी येथे मे. हॉटेल महाराजा काठियावाडी या हॉटेलमध्ये अनुसूची-4 मधील तरतुदींचे उल्लंघन, हॉटेलमधील अस्वच्छ परिस्थिती, स्टोअररूममध्ये उंदरांची विष्ठा आढळून आली. मुदतबाह्य अन्नपदार्थ साठविण्यासह अन्न तयार करण्याच्या जागेत धूळ व कीटकांचा प्रवेश रोखण्यासाठी व्यवस्था नसल्याचे आढळून आले.

नाशिकमधील मान्यवर हॉटेल्सचा या कारवाईत समावेश असल्याने व्यावसायिक आणि ग्राहकांमध्येदेखील खळबळ उडाली आहे. या कारवाया अन्न सुरक्षा अधिकारी अश्‍विनी पाटील, ऋतुजा नवले, प्रतीक भड, किशोर चांदगुडे व संकेत येलमामे यांनी केल्या आहेत. यापुढेदेखील अन्न सुरक्षिततेसाठी अशीच कारवाई चालू राहणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनातर्फे सूचित करण्यात आले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group