गावाला पाणी मिळावं म्हणून धरणात उतरला, पाइपलाइन जोडून पोहत माघारी निघाला; सरपंचपुत्राचा दुर्दैवी अंत!
गावाला पाणी मिळावं म्हणून धरणात उतरला, पाइपलाइन जोडून पोहत माघारी निघाला; सरपंचपुत्राचा दुर्दैवी अंत!
img
Nandini khandare More

गावातील नागरिकांना पाणीपुरवठा व्हावा, यासाठी पाइपलाइन जोडण्याचे काम करण्यासाठी धरणात उतरलेल्या तरुणावर काळाने घाला घातला आहे. काम पूर्ण झाल्यानंतर पोहत माघारी येत असताना मध्येच दम लागल्याने सरपंचपुत्राचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पद्मावती धरणात ही हृदयद्रावक घटना घडली

घटनेची अधिक माहिती अशी की , जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात पाण्यात बुडून सरपंच पुत्राचा मृत्यू झाला आहे. भोकरदन तालुक्यातील पद्मावती धरणात ही घटना घडली. मधुकर महाले असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव असून ते बुलढाणा जिल्ह्यातील मसरूळ गावच्या सरपंचाचे पुत्र होते. मसरुळ गावाला पद्मावती धरणातून  पाणीपुरवठा केला जातो. याच पाणीपुरवठा योजनेच्या सार्वजनिक विहिरीला पाईप जोडण्याचे काम करण्यासाठी मधुकर महाले धरण परिसरात गेले होते. काम संपल्यानंतर ते आपल्या एका सहकाऱ्यासोबत पोहत धरणाबाहेर येण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, पोहत असताना मध्येच दम लागल्याने ते पाण्यात बुडाले. या घटनेनंतर शोधमोहीम राबवण्यात आली. अखेर उशिरा एनडीआरएफ पथकाच्या  मदतीने मधुकर महाले यांचा मृतदेह धरणातून बाहेर काढण्यात यश आले. गावाच्या पाणीपुरवठ्यासाठी काम करत असताना घडलेल्या या घटनेमुळे मसरुळ गावावर शोककळा पसरली आहे.

बुलढाणा तालुक्यातील मासरूळ येथे शकुंतलाबाई महाले या सरपंच आहेत. ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी मधुकर महाले कायम पुढाकार घेत होते. जवळच असलेल्या पद्मावती धरणाहून गावाला पाणीपुरवठा होतो. धरणाच्या बुडीत क्षेत्रात विहीर खोदण्यात आली आहे. त्या ठिकाणाहून गावापर्यंत पाणी वाहून नेणारी जलवाहिनी टाकण्यात आली आहे. मधुकर महाले व ग्रामपंचायत सदस्य के. के. सिनकर हे या विहिरीजवळ पाइपलाइन जोडण्यासाठी दुपारी अडीचच्या सुमारास गेले होते. काम पूर्ण झाल्यानंतर दोघेही पोहत परत येत होते.

 मात्र, मधुकर महाले यांना पोहोताना दम लागला, त्यामुळे ते पाण्यात बुडाले. के.के. सिनकर यांना ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी काठावर येऊन गावातील लोकांना मदतीसाठी बोलावले. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी संभाजी पवार हे शोध व बचाव पथकासह घटनास्थळी पोहोचले. मधुकर यांचा शोध सुरू झाला. सुमारे तीन तासांनंतर त्यांचा मृतदेह पद्मावती धरणातून बाहेर काढण्यात आला. मधुकर महाले यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group