भाजपला मोठा झटका! माजी आंतरराष्ट्रीय खेळाडूने सोडली साथ, राजकीय वर्तुळात खळबळ
भाजपला मोठा झटका! माजी आंतरराष्ट्रीय खेळाडूने सोडली साथ, राजकीय वर्तुळात खळबळ
img
Nandini khandare More
भाजपला अवघ्या दोन दिवसांत दोन मोठे राजकीय धक्के बसले आहेत! केरळमध्ये आधी पद्मजा वेणुगोपाल यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये परतण्याची घोषणा केली आणि आता माजी आंतरराष्ट्रीय धावपटू पद्मिनी थॉमस यांनीही भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे केरळच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. पद्मजा वेणूगोपाल पाठोपाठ माजी आंतरराष्ट्रीय धावपटू पद्मिनी थॉमस हेही पक्ष सोडण्याची तयारीत आहेत. भाजपनं दिलेली आश्वासने पाळली नसल्याचा आरोप करत थॉमस यांनी पुन्हा ‘काँग्रेस’मध्ये घरवापसी करणार असल्याची चर्चा सुरू झाली

पद्मिनी थॉमस या सध्या केरळ भाजपच्या राज्य अल्पसंख्याक मोर्चाच्या उपाध्यक्षपदावर कार्यरत होत्या. आपला राजीनामा त्या आज शुक्रवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांच्याकडे सुपूर्द करणार आहेत. काँग्रेस हा आपला ‘परिवार’ असल्याचे सांगत आपण पुन्हा स्वगृही परतत असल्याचे त्यांनी स्पष्ट केलंय.

नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत थॉमस यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, “मी आजच माझा राजीनामा देणार आहे. क्रीडा किंवा राजकारणाच्या माध्यमातून काहीतरी भरीव काम करता येईल, या अपेक्षेने भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, गेल्या दोन वर्षांत मला या दोन्ही क्षेत्रांत काहीच करता आले नाहीये.


कोणत्याही विशिष्ट अटीवर आपण भाजपमध्ये गेलो नव्हतो, परंतु पक्षात आल्यानंतर नेतृत्वाने अनेक आश्वासने दिली होती, असा दावा थॉमस यांनी केला. “पक्षाने मला विधानसभा निवडणुकीचे तिकीट किंवा क्रीडा क्षेत्रात एखादे महत्त्वाचे पद देण्याचे आश्वासन दिले होतं; परंतु यापैकी काहीच प्रत्यक्षात उतरले नाही. सध्याच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या उपाध्यक्षपदावर काम करण्यास कोणताही वाव नव्हता,” अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

केरळचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते के. करुणाकरन यांच्या कन्या पद्मजा वेणुगोपाल यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये परतण्याची घोषणा केल्याच्या अवघ्या एका दिवसानंतर पद्मिनी थॉमस यांनीही हाच मार्ग स्वीकारल्याने केरळच्या राजकारणात मोठी खळबळ उडालीय.

इतर बातम्या
Join Whatsapp Group